‘आयआरबी’चे २५ कोटी जप्त करणार : बिदरी
By Admin | Updated: November 16, 2014 00:53 IST2014-11-16T00:28:29+5:302014-11-16T00:53:45+5:30
‘स्थायी’ ची बैठक : जिल्हाधिकाऱ्यांना उद्या पत्र देऊ

‘आयआरबी’चे २५ कोटी जप्त करणार : बिदरी
कोल्हापूर : शहरात राबविण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांसह जावळाचा गणपती ते इराणी खण हा मुख्य रस्ता जर ‘आयआरबी’ने केला नाही, तर त्यांची २५ कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करून, त्यातून ही अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत सोमवारीच (दि. १७) जिल्हाधिकारी राजाराम माने यांना पत्र पाठवून आयआरबीचे २५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करावेत, अशी विनंती केली जाणार आहे.
आज, शनिवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनीच ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते.
टोलवसुली सुरू झाल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करावीत; तसेच रस्त्यांची दुरुस्ती करावी म्हणून
१ आॅक्टोबर रोजी महानगरपालिकेने आयआरबीला कळविले होते; परंतु १७ आॅक्टोबरला उलट टपाली टोलची वसुली व्यवस्थित होत नसल्याचे पत्र आयआरबीने पालिकेला दिले आहे. यामुळे अपूर्ण कामे करण्यास आयआरबी असमर्थ असल्याचे दिसते. म्हणूनच आपल्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सब-स्टेअरिंग्ां कमिटीच्या बैठकीत चर्चा करून शासनाला अहवाल दिला जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशावरून अपूर्ण कामांसाठी अनामत म्हणून ठेवलेले २५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करावेत, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली जाणार असल्याचे बिदरी यांनी स्पष्ट केले. शारंगधर देशमुख यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
गेल्या काही दिवसांपासून शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी शारंगधर देशमुख, दिगंबर फराकटे, राजेश लाटकर, आदिल फरास, आदींनी केल्या.
पुईखडी येथील कनेक्शन क्रॉस करणे आवश्यक असल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तावडे हॉटेल परिसरातील पाडण्यात आलेली बांधकामे पुन्हा नव्याने बांधण्यात आली. न्यायालयाची स्थगिती असताना अशी बांधकामे झालीच कशी? अशी विचारणा करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शारंगधर देशमुख व सभापती सचिन चव्हाण यांनी केली. त्यावेळी न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल याचिका दाखल केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी चर्चेत सुभाष रामुगडे, यशोदा मोहिते, सतीश लोळगे, सतीश घोरपडे, आदींनीही भाग घेतला.
युवराज पाटील यांचा पुतळा उभारा
कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचा पुतळा खासबाग कुस्ती मैदानात उभारण्यात यावा, अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली.