बिडकरांचे निसर्गचित्र प्रदर्शन खुले
By Admin | Updated: March 27, 2017 00:34 IST2017-03-27T00:34:53+5:302017-03-27T00:34:53+5:30
रसिकांची गर्दी : कलाविश्वातील मान्यवरांना बिडकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार

बिडकरांचे निसर्गचित्र प्रदर्शन खुले
कोल्हापूर : सिनेकला दिग्दर्शक चित्रकार कै. बळिराम बिडकर व ज्येष्ठ चित्रकार रमेश बिडकर या
पिता-पुत्रांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाला रविवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच कलारसिकांची प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सिनेकला दिग्दर्शक चित्रकार
कै. बळिराम बिडकर कलाप्रतिष्ठानतर्फे आज, रविवार ते शनिवार (दि. १) या कालावधीत कै. बळिराम बिडकर आणि रमेश बिडकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी ४.४५ वा. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे माजी प्राचार्य शिवाजी शर्मा, चित्रकार संजीव संकपाळ, सिनेअभिनेते जयकुमार परूळेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश बिडकर, अध्यक्ष के. आर. कुंभार, कार्यवाहक शिल्पकार अतुल डाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रप्रदर्शनात बिडकर पिता-पुत्रांची सुमारे ३५ चित्रे आहेत. यामध्ये कै. बळिराम बिडकर यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर ठिकाणी काढलेल्या २८ चित्रांचा, तर रमेश बिडकर यांनी चित्रबद्ध केलेल्या सात चित्रांचा समावेश आहे. जलरंगातून साकारलेले हे निसर्गचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सायंकाळनंतर कलारसिकांची एकच गर्दी झाली होती. शनिवार (दि.१) पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे चित्रपटक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले सिनेअभिनेते मास्टर अबू, ज्येष्ठ चित्रकार जे. बी. सुतार, चित्रकार कला अध्यापक प्रा. सत्यजित वरेकर (सांगली) आणि नागेश हंकारे (कोल्हापूर) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.