दौलत कारखान्याची निविदा अखेर रद्द
By Admin | Updated: November 19, 2015 01:11 IST2015-11-19T01:05:38+5:302015-11-19T01:11:03+5:30
प्रतिसादच मिळेना : जिल्हा बॅँकेसमोरील पेच

दौलत कारखान्याची निविदा अखेर रद्द
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर अथवा विक्रीची प्रसिद्ध केलेली निविदा अखेर रद्द झाली. कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती मागवून इच्छुक थंडच राहिल्याने ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे बॅँकेला निविदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
दौलत साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेची ६५ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बॅँकेने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत कारखाना भाडेतत्त्वावर व विक्रीबाबत आठ ते नऊ निविदा काढण्यात आल्या होत्या; पण त्याला प्रतिसादच मिळत नाही.
कारखाना गेले चार हंगाम बंद आहे. हा हंगाम वाया जाऊ नये, यासाठी बॅँकेने जोरदार प्रयत्न केले होते. यासाठीच बॅँकेने पुन्हा २८ आक्टोबरला निविदा प्रसिद्ध केली होती. त्याची मुदत ७ नोव्हेंबरपर्यंत होती. कारखान्यावरील कर्जाचा बोजा किती आहे, याबाबत लेखापरीक्षणाचा अहवाल इच्छुक कंपन्यांनी मागितला होता.
बॅँकेने कारखाना प्रशासनाकडे लेखापरीक्षणाचा अहवाल मागितला होता. कारखान्याने हा अहवाल दिला; पण इच्छुक कंपन्यांनी पुढे पाऊलच टाकले नाही. पाच कंपन्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल द्या, असे लेखी पत्र फक्त या कालावधीत दिले. त्यामुळे बॅँकेने ही प्रक्रिया रद्द केली आहे. (प्रतिनिधी)