‘थर्टी फाईव्ह बॉय’ला शासनाकडून सायकल भेट

By Admin | Updated: June 17, 2015 00:39 IST2015-06-16T23:45:45+5:302015-06-17T00:39:19+5:30

अर्जुनवाड येथे प्रदान : विनोद तावडे यांच्या घोषणेची झाली पूर्तता

A bicycle gift from the government to 'Thirty Five Boy' | ‘थर्टी फाईव्ह बॉय’ला शासनाकडून सायकल भेट

‘थर्टी फाईव्ह बॉय’ला शासनाकडून सायकल भेट

जयसिंगपूर : दहावी परीक्षेत प्रत्येक विषयात ३५ गुण मिळविलेल्या अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील दत्ताजीराव कदम हायस्कूलचा विद्यार्थी इंद्रजित वसंत मोरे याला राज्य शासनाच्यावतीने सायकल भेट देण्यात आली.
एस.एस.सी. परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. नुकताच एस.एस.सी. परीक्षेचा निकाल लागला. यात सर्व विषयांत ३५ टक्के गुण अर्जुनवाडच्या इंद्रजित मोरे याला मिळाले. त्याचा हा निकाल कुतूहलाचा विषय बनला होता. विशेष बाब म्हणजे गावातील क्रांतिवीर ग्रुप मंडळाने इंद्रजितचा डिजिटल फलक लावून हार्दिक अभिनंदन केले. शासनाकडूनही याची दखल घेण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोरे याला सायकल देण्याची घोषणा केली होती. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने मंगळवारी अर्जुनवाड येथे कोल्हापूरचे नगरसेवक सुभाष रामुगडे, जि. प. सदस्य देवानंद कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष महावीर तकडे, उपाध्यक्ष शिवाजी खोंद्रे यांनी मोरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिक्षणमंत्री यांनी घोषणा केल्यानुसार इंद्रजितला सायकल भेट दिली. यावेळी इंद्रजितचे वडील वसंत मोरे, आई अंजना मोरे, शीतल मोरे, अरविंद मोरे, अनिल चौगुले, सचिन दुधाळे, विकास पाटील, पोपट पुजारी, शंकर बिराजदार, विनोद गायकवाड, सागर फडतारे, सचिन जाधव, उदयसिंग मेडसिंगे उपस्थित होते. शाळेच्यावतीने इंद्रजितचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)



इंद्रजितला ३५ टक्के गुण मिळाल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर राज्यात त्याला मिळालेल्या टक्केवारीची चर्चा झाली. ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने याची दखल घेऊन त्याला मंगळवारी सायकल दिली असली, तरी त्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया वडील वसंत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: A bicycle gift from the government to 'Thirty Five Boy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.