साडेसात हजार मुलींना सायकलचा आधार
By Admin | Updated: July 6, 2015 00:27 IST2015-07-06T00:14:46+5:302015-07-06T00:27:08+5:30
पावणेतीन कोटी खर्च : पाचवी ते बारावीपर्यंत मुली

साडेसात हजार मुलींना सायकलचा आधार
कोपार्डे : घरापासून शाळेपर्यंतचे अंतर ३ ते ५ कि.मी. असणाऱ्या व पाचवी ते बारावीपर्यंतच्या मागासवर्गीय व अल्प उत्पन्न असणाऱ्या मुलींसाठी शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेने शासकीय सायकल योजनेतून जिल्ह्यातील सात हजार ५६९ मुलींना सायकलींचे वितरण केले आहे. यात महिला व बालकल्याण विभागाकडून दोन हजार ६५७, तर समाज कल्याण विभागाकडून चार हजार ९१३ सायकलींचे वाटप केले आहे.
ग्रामीण भागातील मुलींना एस.टी. बससाठी मोफत पास सेवेबरोबर कायमस्वरूपी प्रवासातील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन आघाडी शासनाने ही सायकल योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविली. मागासवर्गीय मुलींना समाजकल्याण विभागामार्फत, तर ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न २१ हजारांपेक्षा कमी आहे, अशा मुलींना महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल योजनेतून सायकल वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेने ही योजना राबविण्यासाठी दोन कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद केली होती. यातून महिला व बालकल्याण विभागाकडून ९८ लाख ९७ हजार १२० रुपये खर्चून दोन हजार ६५७ सायकली वाटप करण्यात आल्या. २०१४-१५ साठी हा निधी खर्च केला आहे. त्याशिवाय २०१३-१४ मध्ये करवीर व कोल्हापूर ग्रामीणमधील सायकल प्रस्ताव मंजूर होते, पण वाटप झाले नव्हते अशा १२८ सायकलीही २०१४-१५ मध्ये वाटप करण्यात आल्या आहेत.
समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय मुलींना सायकल योजनेतून २०१४-१५ साठी सायकल वाटपसाठी एक कोटी ७४ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पैकी एक कोटी ७४ लाख ६५ हजार ७१५ रुपये निधी खर्च करून चार हजार ९१३ सायकली खरेदी करून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. सायकलींची निविदा मागवून की लिलाव पद्धतीने खरेदी करावयाच्या यातून मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र, लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी प्रशासकीय व लोकप्रतिनिधींनी आपला
हेका सोडल्याने जिल्ह्यातील साडेसात हजार मुलींना शाळेला पोहोचण्यासाठी सायकलचा आधार मिळाला आहे. (वार्ताहर)
तालुकावार सायकल वितरणाची २०१४-१५ ची आकडेवारी
तालुक्याचेमहिला व बालसमाजकल्याण
नावकल्याण विभागविभाग
करवीर६०३१०३०
कागल१९४२६५
पन्हाळा१८५१३२
राधानगरी२४११३५
शाहूवाडी१८५१००
शिरोळ१५३७२०
हातकणंगले१९८१५२३
गगनबावडा६४२००
गडहिंग्लज१६८११०
चंदगड२८५१४०
भुदरगड२०२१४५
आजरा७९४१०
एकूण२६५७४९१३
2,657
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून
4,913
समाजकल्याण विभागाकडून सायकलींचे शालेय मुलींना वाटप