राजाराम लोंढेकोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना हळूहळू दिलासा मिळू लागला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवी वाटपाचे कामकाज अवसायक मंडळ करत आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवींचे दोन कोटींचे वाटप करण्यात आले. आता, पुन्हा दहा हजारांप्रमाणे दीड कोटीचे वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासाठी पतसंस्थेकडे दोन हजार ठेवीदारांनी अर्ज केले आहेत.भुदरगड नागरी पतसंस्था २००७ मध्ये सहकार विभागाने अवसायनात काढली; पण जवळपास दोन लाखांहून अधिक ठेवीदार अडचणीत आले होते. शासनाने विभागीय सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली अवसायक मंडळ नेमले. या प्रकरणात उच्च न्यायालयानेही अवसायक मंडळाला निर्देश दिले होते; पण अवसायक मंडळाने पैशाच्या उपलब्धतेनुसार दोन टप्पे करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील दहा हजार रुपयांप्रमाणे दोन कोटींचे वाटप करण्यात आले. १५ ऑक्टोबर २०२४ पासून नव्याने दहा हजार रुपये वाटप करण्यास अवसायक मंडळाने सुरू केले आहे. त्यासाठी दोन हजार अर्ज आले असून, यातून दीड कोटीचे वाटप होऊ शकते.
केवायसीमध्ये अडकल्या ठेवी‘भुदरगड’ पतसंस्थेत छोट्या-छोट्या ठेवीदारांची संख्या लक्षणीय आहे. केवायसी पूर्तता केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत; पण अनेकांकडे ठेवीच्या पावत्या नाहीत, काही ठेवीदार मृत असल्याने अडचणी येत आहेत.
दृष्टिक्षेपात भुदरगड पतसंस्था
- स्थापना - १९७७
- कार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे
- शाखा - ५२, पतसंस्था अडचणीत आली - २००२, अवसायक नेमणूक - २००७, थकीत कर्ज - २५५ कोटी
- वसूल - १२३ कोटी,
- येणे कर्ज - १३२ कोटी
- परत केलेल्या ठेवी - १७३ कोटी,
- देय ठेवी - ८२ कोटी