‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदीदारांच्या अंगावर

By Admin | Updated: September 2, 2015 00:04 IST2015-09-02T00:04:17+5:302015-09-02T00:04:17+5:30

‘केडीसी’ ,‘भुदरगड’चे गुऱ्हाळ : बोजा उतरवण्याबाबत अडवणूक

'Bhoodargad' property purchasers | ‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदीदारांच्या अंगावर

‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदीदारांच्या अंगावर

राजाराम लोंढे- कोल्हापूर  -कर्जाची परतफेड झाली, मालमत्तेचा कब्जा मिळाला पण गेले अनेक वर्षे मालमत्तेवरील जिल्हा बँकेचा बोजाच उतरत नसल्याने भुदरगड नागरी पतसंस्थेच्या खरेदी केलेल्या २२ मालमत्ता अडचणीत सापडल्या आहेत. जिल्हा बँकेची थकीत रक्कम देण्यास ‘भुदरगड’चे अवसाय मंडळ तयार आहे, पण बँकेने व्याजासह संपूर्ण रक्कम भरण्याचा तगादा लागल्याने हा पेच निर्माण झाला आहे. ‘भुदरगड’ पतसंस्था अवसायनात काढली त्यावेळी पावणे दोन लाख ठेवीदार तर ४०६३ कर्जदार होते. ठेवी परत करण्यासाठी राज्य सरकारने अवसायक मंडळाला १५ कोटी ५० लाख रुपये दिले. उर्वरित ठेवीदारांचे पैसे थकीत कर्जाची वसुली व मालमत्ता विक्री करून देण्याचे आदेश आहेत. तारण मालमत्तांची विक्री व वसुलीची सुमारे २५ कोटींची रक्कम स्टेट बॅँकेत आहे. अवसायक मंडळाने पतसंस्थेच्या अनेक मालमत्तांची विक्री करून संबंधितांना ताबा दिला खरा पण त्यावरील जिल्हा बँकेच्या कर्जाचा बोजा अद्याप कमी झालेला नाही.
‘भुदरगड’ पतसंस्थेने जिल्हा बँकेकडून दहा कोटी कर्ज घेतले होते. त्यापैकी पतसंस्थेने ३ कोटी ८७ लाखांची परतफेड करूनही ९ कोटी २६ लाखांची थकबाकी दिसते पण प्रचलित व्याजदराने (बॅँकेच्या म्हणण्यानुसार) ही रक्कम २७ कोटी रुपये होते; पण अवसायक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर थकीत कर्जाला व्याज आकारता येत नसल्याने २००७ पर्यंत ही रक्कम १४ कोटी ४४ लाख रुपये होते. यापैकी ९ कोटी २६ लाख रुपये भरण्यास अवसायक मंडळ तयार आहे तसे त्यांनी बँकेचे प्रशासकांकडे प्रयत्नही केले होते, पण त्याला प्रशासकांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी ‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदी केलेले अडचणीत आले आहेत.


न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही ‘भुदरगड’ची मालमत्ता खरेदी केली, त्याचे पैसे बॅँकेत भरूनही आमच्या मालमत्तेवरील बोजा कमी केला जात नाही. जिल्हा बॅँकेने ‘गायन क्लब’सारख्या सामाजिक संस्थेची अडवणूक करणे योग्य नाही. या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.
- व्ही. बी. पाटील,
अध्यक्ष, गायन समाज देवल क्लब

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अवसायक मंडळाचे कामकाज सुरू आहे. औपचारिकता म्हणून काही अटी घालून जिल्हा बँकेचे थकीत मुद्दल देण्यास तयार आहे, हे बॅँकेला मान्य नाही. याबाबत दोन दिवसांत आयुक्त कार्यालयात बैठक आहे. बँकेचे पैसे देऊन मालमत्तेवरील बोजा उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- राजेंद्र दराडे, अध्यक्ष, अवसायक मंडळ, भुदरगड पतसंस्था

Web Title: 'Bhoodargad' property purchasers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.