भोई, मुस्लिम मतदानाचे पॉकेट ठरणार ‘निर्णायक’
By Admin | Updated: October 20, 2015 00:18 IST2015-10-20T00:05:23+5:302015-10-20T00:18:35+5:30
अटीतटीची लढत : दोन माजी नगरसेवकांच्या पत्नींसह सहाजण रिंगणात--शिपुगडे तालीम

भोई, मुस्लिम मतदानाचे पॉकेट ठरणार ‘निर्णायक’
कोल्हापूर : ‘शिपुगडे तालीम’ हा नवीन, पुनर्रचनेत तयार झालेला प्रभाग आहे. आजपर्यंत या प्रभागातून मतदारांनी दर पाच वर्षांनी नवख्या उमेदवारालाच संधी दिली आहे. या प्रभागात सध्या स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे यांच्या पत्नी, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या पत्नी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्या घोरपडे व पद्मावती विजय घाटगे, अपक्ष लता वसंत शिंदे नशीब अजमावत आहे.
या प्रभागातून अमृता सावंत यावेळेला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन मतदारांसमोर जात आहेत, तर नंदकुमार मोरे यांचे निवासस्थान असलेला, हक्काचे मतदान असलेला व त्यांना पूरक असलेला असा हा मतदारसंघ आहे. गतवेळेला भोई आणि मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश गवंडी यांना भरघोस मते दिली. त्यांचा विजय सुकर झाला. गवंडी हे या वेळेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार सरिता मोरे यांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर नंदकुमार मोरे यांचा घर ते घर संपर्क, सातत्याने सक्रिय जनसंपर्क असल्यानेही त्यांची ही जमेची बाजू आहे. मोरे यांना मानणारे गोपनीय मतदान आहे. त्याचबरोबर भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार पवित्रा देसाई यांचे पती संदीप हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत. २०१० ला ते जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार होते. त्यामुळे त्यांचाही या प्रभागात जनसंपर्क आहे. गेली पाच वर्षे ते नागरिकांच्या अडीअडचणी सोडवीत आहेत. केएमटीचे माजी जनसंपर्क अधिकारी प्रताप घोरपडे यांच्या पत्नी विद्या या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. विद्या घोरपडे या महिला शहर उपाध्यक्षा आहेत. त्यांनी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला आहे. त्यांचाही घर ते घर प्रचार सुरू असून, चौथी फेरी सुरू आहे.
याचबरोबर पद्मावती विजय घाटगे व लता वसंत शिंदे या अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. ( प्रतिनिधी )
फराकटेंचा थांबण्याचा निर्णय
गेल्यावेळी येथून निवडून आलेले माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी यावेळी थांबण्याचा निर्णय घेतला आहे; तर २००० मध्ये अवघ्या चार मतांनी पराभूत झालेल्या अमृता सावंत शिवसेनेच्या उमेदवार आहेत. गेली १५ वर्षे त्यांचे पती धनंजय सामाजिक कार्यात आहेत. तेही २००५ ला निवडून आले होते. पण, त्यांचा जातीचा दाखला अपात्र ठरविल्याने त्यांची कारकीर्द अवघ्या १७ महिन्यांची राहिली. त्यानंतरही ते विविध प्रश्नांत अग्रेसर आहेत.
या प्रभागात भोई, मुस्लिम, परीट, जैन समाजाचे मतदार आहेत. त्यात विशेषत: भोई, मुस्लिम यांची मतदारसंख्या जास्त आहे. या दोन्ही समाजांची मतेच या वेळेला निर्णायक ठरणार आहेत. नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघात मराठा समाजासह भोई, परीट, मुस्लिम यांची मतदारसंख्या जास्त आहे.