भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर
By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-13T00:38:37+5:302014-07-13T00:42:59+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस : ‘पंचगंगे’ची पातळीही वाढली

भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर
कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यावर्षी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पातळीही वाढली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
जिल्ह्यात आज, शनिवारी पावसाचा जोर थोडा वाढला. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा तालुक्यांत दमदार पाऊस सुरू होता. कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ व करवीर तालुक्यांत पावसाचा जोर कमी असला, तरी दिवसभर रिपरिप सुरू होती. भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी, पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, भोगावती नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा पात्रातील मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. पाण्याची पातळी १३ फुटांपर्यंत वाढली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २४.६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, भुदरगड व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस असल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्ता खराब झाल्याने या तिन्ही तालुक्यांतील सात मार्गावरील वाहतूक अंशत: बंद झाली आहे. (प्रतिनिधी)