भोगावती नदीचे प्रदूषण उच्च न्यायालयात
By Admin | Updated: December 23, 2014 00:41 IST2014-12-23T00:40:47+5:302014-12-23T00:41:06+5:30
‘लोकमत’ची कात्रणे सादर : प्रदूषण मंडळाचे कातडी बचाव

भोगावती नदीचे प्रदूषण उच्च न्यायालयात
कोल्हापूर : भोगावती नदीत दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित पाणी सोडले कुणी याचा शोध घेण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळास दोन दिवसानंतरही अपयश आले. प्रदूषण मंडळ कुणाला वाचविण्यासाठी कातडी बचाव भूमिका घेत आहे का, अशी शंका त्यामुळे उपस्थित होत आहे. त्या परिसरात कोणताही उद्योग नाही तरीही पाणी प्रदूषित कसे होते याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दरम्यान दूषित पाण्यामुळे मासे मेले यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवस प्रसिद्ध झाले. या बातमीची कात्रणे पंचगंगा प्रदूषणाच्या सुनावणीवेळी आज, सोमवारी याचिकाकर्त्याचे वकील धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात सादर केली.
भोगावती नदीमध्ये हळदी बंधाऱ्यास बरगे घालून पाणी अडविले आहे. मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत शुक्रवारी सायंकाळनंतर बंधाऱ्यापर्यंत मिसळले. त्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले होते. परिणामी परिते, हळदी, कुरुकली, कोथळी, देवाळे, आदी गावांचा पाण्याचा प्रश्न भीषण झाला. प्रदूषित पाण्यामुळे मासे मेले. दुर्गंधी सुटली होती. फक्त ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. याचे पडसाद उच्च न्यायालयात उमटले.
दोन दिवस भोगावती नदीच्या प्रदूषणासंबंधी आलेल्या बातम्यांचे कात्रणच न्यायालयात आज सोमवारी अॅड. धैर्यशील सुतार यांनी सादर केले. प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक आम्हाला काही माहिती नाही, असे म्हणत कानावर हात ठेवत आहे. राजकीय दबावापोटी संबंधित कारखान्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप करून ‘लोकमत’ने वस्तुस्थिती समोर आणली, असेही अॅड. सुतार यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने कात्रणाची काळजीपूर्वक पाहणी करीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांकडे देण्याचे सूचित केले व यासंदर्भातही प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणातून ६०० क्युसेक्स पाणी भोगावती नदीत सोडले आहे. हे पाणी हळदी बंधाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. यामुळे दूषित पाण्यामुळे निर्माण झालेला सहा गावांतील पाणी प्रश्न निकालात निघाला आहे. राधानगरीतून पाणी आल्यामुळे दुर्गंधीयुक्त, दूषित पाणी वाहत आहे. यामुळे कोल्हापूरपर्यंत दूषित पाणी येऊन पोहोचणार आहे.
दोन दिवसांनंतरही दूषित पाणी कोठून आले याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ अनभिज्ञ आहे. यामुळे कारवाई कोणावर करणार, असे ‘प्रदूषण’चे अधिकारी म्हणत आहेत. भोगावती कारखान्यांतून मळीचे तीन टँकर कोठे गेले, याचाही शोध घेण्यात अपयश आलेले आहे.