‘भोगावती’चा २५९२ रुपये ऊसदर जाहीर
By Admin | Updated: December 23, 2014 00:41 IST2014-12-23T00:40:06+5:302014-12-23T00:41:16+5:30
धैर्यशील पाटील-कौलवकर : तीस कोटी तोटा सहन करणार

‘भोगावती’चा २५९२ रुपये ऊसदर जाहीर
भोगावती : भोगावती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामधील उसाला प्रतिटन दोन हजार ५९२ एवढा ऊस दर देण्याची घोषणा केली. कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, उपाध्यक्ष हंबीरराव पाटील आणि कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती आज दिली.
पाटील म्हणाले की, भोगावती साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सातत्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला. कारखान्यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस, शे.का.प. आणि जनता दलाची सत्ता आल्यानंतर काटकसर करत कारभार केला आहे. गेल्या गळीत हंगामातील उसाचे शेतकऱ्यांचे सर्व बिल अदा केले आहे. तोडणी-ओढणीची सर्व देणी दिली आहेत.
चालू गळीत हंगामातील उसाला दोन हजार ५९२ एवढा जिल्ह्यताील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस दर दिला आहे. एफआरपीप्रमाणे दिल्या जाणाऱ्या या ऊसदरामुळे ३० कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. तो भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून उसाला प्रतिटन ७०० रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे, अशी माहिती दिली.
यावेळी माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील, रघुनाथ जाधव, विश्वास पाटील, अशोकराव पाटील, केरबा पाटील, प्रा. किरण चौगले, पांडुरंग डोंगळे, संदीप पाटील, वसंतराव पाटील, शंकर पाटील, आदी उपस्थित होते.
आतापर्यंत एक लाख ५८ हजार टन ऊस गाळप केला असून, एक लाख ७३ हजार २८० साखर पोती उत्पादन झाले आहे.
सरासरी ११.१७ टक्के, तर दररोज १२.२० टक्के एवढा उतारा मिळाला आहे.
महिनाअखेर ऊस बिल एकरकमी खात्यावर जमा करणार, असेही सांगितले.
कारखान्याची गाळप क्षमता चार हजार टनांची असून, यावर्षी किरकोळ सुधारणा केल्याने पाच हजार ५४० टनांचे उच्चांकी गाळप झाले आहे.
सध्या चालू गळीत हंगामात ३२ दिवसांत सरासरी चार हजार ९३८ एवढे गाळप केले आहे.