कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश

By Admin | Updated: June 4, 2015 00:02 IST2015-06-03T23:16:25+5:302015-06-04T00:02:34+5:30

अंनिस-पोलिसांची कारवाई : महाराष्ट्र-कर्नाटकात जाळे; भाविकांची लुबाडणूक

Bhiwandi woman exposed in Kumtheha | कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश

कुमठेत भोंदू महिलेचा पर्दाफाश

तासगाव : करणी, भूतबाधा, सातीआसरा यासारखे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अघोरी प्रकार करणाऱ्या कुमठे (ता. तासगाव) येथील मंगल पांडुरंग बडेकर (वय ६२) या भोंदू महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि तासगाव पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. या महिलेच्या कारनाम्यांचे जाळे महाराष्ट्रासह कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात असून, तिच्याकडे येणाऱ्या लोकांची हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंत लुबाडणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
कुमठे येथील मंगल बडेकर ही महिला देवीच्या नावाच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणारे उपाय करते व त्यासाठी ती पैसे घेत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे आली होती. त्याची दखल घेत समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविक म्हणून या महिलेशी संपर्क साधला. प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी तिच्या घरी मोठा दरबार भरतो. या दरबारात जाऊन कार्यकर्त्यांनी मूल होत नाही, सासू त्रास देते, यावर उपाय सांगा, अशी विनवणी केली. त्यावर मंगल बडेकर हिने, सात शुक्रवार करा, परडी बांधून देईन, ती अमावास्येच्या रात्री नदीत सोडा. त्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. ‘मूल होण्यासाठी सातीआसराचे बंधन बांधून देईन, ते काढून देण्याची रक्कम नंतर सांगेन’, असेही तिने सांगितले.
हे उपाय योजण्यासाठी बुधवारी भेटतो, असे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी तिला सांगितले होते. दरम्यान, तिच्याविरोधात तासगाव पोलिसांत ‘अंनिस’चे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, मधुकर पवार, प्रियांका तुपलोंढे, ज्योती अदाटे, जावेद पेंढारी, राणी कदम, पूर्ती पाटील यांनी तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. (पान १० वर)

बडेकरच्या भाविकांचे मोठे जाळे
करणी, लागीर, सातीआसरा काढणे यासारख्या अनेक गोष्टींचा व्यवसाय मंगल बडेकरकडून गेल्या आठ वर्षांपासून राजरोस सुरू आहे. त्यासाठी व्यक्ती पाहून हजार रुपयांपासून पुढे पैसे उकळण्याचा फंडा बडेकरने सुरू केला होता.
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकही मोठ्या प्रमाणात तिच्याकडे येत होते. भाविकांच्या घरी जाऊनही असे प्रकार ती करीत असे. बडेकरकडे येणाऱ्यांत गलाई बांधवांची संख्या मोठी होती. ही भोंदूगिरी चव्हाट्यावर आल्याने तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Bhiwandi woman exposed in Kumtheha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.