भीमा कृषी प्रदर्शन ३० जानेवारीपासून
By Admin | Updated: January 10, 2015 00:21 IST2015-01-09T23:17:26+5:302015-01-10T00:21:22+5:30
धनंजय महाडिक : २०० बचतगटांचा सहभाग

भीमा कृषी प्रदर्शन ३० जानेवारीपासून
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे भीमा कृषी प्रदर्शन यंदा ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मेरी वेदर ग्राऊंडवर होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विविध पशू-पक्षी, मत्स्य व अश्व प्रदर्शन, तांदूळ महोत्सव हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असेल.
महाडिक म्हणाले, मेरी वेदर ग्राऊंडवर दुपारी १२ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यानिमित्त शेतकरी महिला, संशोधक, तंत्रज्ञांना विविध पुरस्कार आणि शेतीसाठी जीवन समर्पित केलेल्या व्यक्तीला ‘भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्या, बी-बियाणे, खत, औषध त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण पशू-पक्षी या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. प्रदर्शनात सुमारे एक हजार वैशिष्ट्यपूर्ण जनावरे समाविष्ट असून, त्यामध्ये खिलार वळू, गाय, एच एफ, जर्सी, देवणी, डांगी, लाल कंदार, तर म्हशींमध्ये मुऱ्हा, मेहसाना, सुरती, पंढरपुरी जातींच्या म्हशींचा समावेश आहे. विविध जातींचे घोडे, कोंबड्यांमध्ये टर्की, ब्लॅक लेगॉन, रेड आयलॉन, गिरिराज, वनराज, आदी प्रजातींचा समावेश आहे. मांजरामध्ये पर्सियन, विविध दुर्मीळ विदेशी पक्षी आणि विविध जातींचे अश्व समाविष्ट असतील. एकूण ३५० स्टॉलपैकी २०० स्टॉल महिला बचतगटांना दिले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, बियाणे महोत्सव तसेच ऊस तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे, क्रिश अय्यंगार, सत्यजित भोसले यांचे व्याख्यान होणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहील. समारोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रशांत पारडे, श्रीधर बिरंजे, सुजित चव्हाण, डॉ. जे. पी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)