भवानी मंडप लवकरच ट्रॅफिकमुक्त
By Admin | Updated: August 9, 2014 00:27 IST2014-08-09T00:25:45+5:302014-08-09T00:27:33+5:30
‘नो पार्किंग झोन’ करणार : मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात पर्यायी व्यवस्था

भवानी मंडप लवकरच ट्रॅफिकमुक्त
कोल्हापूर : केएमटी थांबा हटविल्यानंतर दुचाकींमुळे सौंदर्य हरवलेला भवानी मंडप परिसर आता वर्दळीपासून मुक्त होणार आहे. पोलीस प्रशासनाच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद आणि छत्रपती देवस्थान ट्रस्टने दिलेल्या सहकार्यामुळे हा परिसर ‘नो पार्किंग झोन’ करून मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भवानी मंडप परिसर म्हणजे, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा वारसा, भवानी मंडप कमान, जुना राजवाडा, तुळजाभवानी मंदिर आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर ही प्रमुख स्थळे याठिकाणी आहेत. परिसरातील लगबग आणि अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर येथील केएमटी थांबा खासबाग येथे हलविण्यात आला. त्यामुळे परिसरातील वर्दळ कमी झाली असली, तरी त्याची जागा दुचाकी पार्किंगने आणि फिरत्या विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसराला अतिशय ओंगळवाणे स्वरूप आले आहे.
पूर्वी केएमटी बसस्टॉप मागे मैदानात जाण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र, नंतर त्यासमोर भिंत बांधून मैदान सुरक्षित करण्यात आले. ही भिंत उतरवून मैदान पार्किंगसाठी देण्यात यावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाने केली होती. या प्रस्तावाला जिल्हा परिषद आणि छत्रपती देवस्थान ट्रस्टने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे येथील पार्किंगचा प्रश्न निकाली लागणार आहे.
भवानी मंडप परिसर छत्रपती देवस्थान ट्रस्टचा असला, तरी केवळ नागरिकांच्या सोयीसाठी तो नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात आला. हा परिसर सुशोभित व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे; पण फक्त ‘नो पार्किंग’ करून न थांबता येथील टपऱ्या, गाळे अन्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.- युवराज संभाजीराजे
भवानी मंडप हा सगळा परिसर हेरिटेज वास्तूंमध्ये येतो. या ऐतिहासिक इमारतींचे सौंदर्य मात्र विविध प्रकारच्या जाहिराती, टपऱ्या, लहान-मोठे दुकान गाळे, फिरते विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, रस्त्यावर बसलेले साहित्य विक्रेते यामुळे झाकोळले गेले आहे. हे सौंदर्य पुन्हा प्रकाशात आणण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे.