भटजी, देव, शपथ अन् काळ्या बाहुलीचा फंडा
By Admin | Updated: October 31, 2015 00:08 IST2015-10-30T00:07:04+5:302015-10-31T00:08:52+5:30
जवळपास सर्वच प्रभागांत वाटप सुरू

भटजी, देव, शपथ अन् काळ्या बाहुलीचा फंडा
कोल्हापूर : प्रभागात ‘दौलत’ नसली तरी शहरातील त्या परिसराचे नाव मात्र तेच आहे. महापालिका निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी या प्रभागात अजब फंडा वापरण्यात येत आहे. त्या परिसरातील काही नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रभागात तब्बल सात उमेदवार रिंंगणात आहेत. प्रचार आज, शुक्रवारी संपत असल्याने आता उमेदवारांनी छुप्या प्रचारासह थेट पैसे वाटण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातील दोन-तीन तरी उमेदवार पैसे देत आहेत. मतदारही तयारीचे असल्याने सगळ्याच उमेदवारांकडून पैसे घेत आहेत. त्यामुळे पैसे देऊनही मतदान फुटू नये, यासाठी एका उमेदवाराने पैसे देण्यासाठी थेट अंधश्रद्धेचाच आधार घेत एका भटजीची मदत घेतली आहे. पैसे द्यायला जाताना सोबत भटजीला नेण्यात येत आहे. मतदारांच्या घरात जाऊन त्यांना तुमचे कुलदैवत कोणते म्हणून विचारण्यात येते. त्यांचे कुलदैवत जोतिबा असेल तर जोतिबाचा फोटो घेऊन, त्यावर गुलाल टाकून मतदारांकडून ‘मी तुम्हालाच मतदान करतो’ म्हणून शपथ घेतली जाते. जोतिबाचा गुलाल फोटो, पैसे व त्या मतदारांनाही लावला जातो. शेजारी मतदारांना भीती वाटावी म्हणून काळी बाहुलीही ठेवली जाते. सरासरी एका मताला एक हजार रुपये असा सर्रास दर आहे. ज्यांनी एक हजार रुपये दिले, त्यांच्या विरोधातील उमेदवार दीड हजार देत आहे. लोकही स्वत:हून चालत आलेली लक्ष्मी नाकारायची कशी, म्हणून हात धुऊन घेत आहेत.
जवळपास सर्वच प्रभागांत वाटप सुरू
पैसे वाटण्याचा प्रकार अपवाद वगळता बहुतांश सर्वच प्रभागांत सुरू झाला आहे. काहींनी बुधवारीच (दि. २८) त्याची सुरुवात केली. पहिल्यांदा आपण पैसे दिले की काही मतदार असे असतात की, ज्यांच्याकडून आपण पहिल्यांदा पैसे घेतले त्यांच्याशी ते प्रामाणिक राहतात, असे त्यांना वाटते. शिवाय विरोधी उमेदवाराने जास्त पैसे दिले तर आपल्यालाही तेवढे द्यावे लागू नयेत, यासाठी आपणच अगोदर पैसे देऊन मोकळे झालेले बरे, असा व्यवहार त्यामागे असतो.