भारती हाळवणकरांची उमेदवारी शक्य !
By Admin | Updated: July 18, 2014 23:24 IST2014-07-18T23:18:35+5:302014-07-18T23:24:53+5:30
इचलकरंजी विधानसभा : मेघा चाळके, हिंदुराव शेळकेंच्या नावांचा बोलबाला

भारती हाळवणकरांची उमेदवारी शक्य !
राजाराम पाटील - इचलकरंजी
भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द आणि वीज चोरी प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी भारती हाळवणकर यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. तसेच माजी नगराध्यक्षा मेघा चाळके व हिंदुराव शेळके यांचीही नावे पुढे आहेत.
हाळवणकर यांना दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याबरोबर त्यांना सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. परिणामी हाळवणकर यांच्या पश्चात आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण, या चर्चेला उधाण आले आहे. हाळवणकर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मे महिन्यातील कोल्हापूर येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, वीज चोरी प्रकरणात आमदार हाळवणकर यांना गोवण्यात आले असून, त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे षड्यंत्र आहे, अशी टीका झाली होती. तसेच हाळवणकर यांच्या पाठीशी भाजप असल्याची ग्वाही काही वक्त्यांनी दिली होती.
आमदार हाळवणकर यांना झालेली शिक्षा, त्यांचे गेलेले विधानसभा सदस्यत्व आणि त्यांना विधानसभा निवडणूक लढविता न येणे, याला भाजपने भावनिक रंग दिला आहे. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांना निवडणूक लढविता आली नाही तर त्यांच्या पत्नी भारती सुरेश हाळवणकर यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यांच्याबरोबर माजी नगराध्यक्षा मेघा सागर चाळके यांचेही नाव चर्चेत आहे. नगराध्यक्षा व नगरपालिकेत केलेल्या कामगिरीची नोंद घेतली जाईल, असेही जाणकारांचे मत आहे. तसेच भाजपतून माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके व कामगार नेते मिश्रीलाल जाजू यांच्याही उमेदवारीचा बोलबाला आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय कॉँग्रेसच्या वाट्याचा असल्याने माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा मागील आठवड्यात शहर कॉँग्रेसच्या मेळाव्यात झाली आहे, तर दोन्ही कॉँग्रेसमधील बेबनाव पाहता ‘राष्ट्रवादी’कडून मदन कारंडे व माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्याही उमेदवारीची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मात्र कामगार नेते दत्तात्रय माने यांचे नाव पुढे येत आहे.