भरतनाट्यम्, कथ्थकची जुगलबंदी
By Admin | Updated: April 12, 2015 23:57 IST2015-04-12T23:02:40+5:302015-04-12T23:57:31+5:30
उपज कलामंचचे आयोजन : कोल्हापूरकरांची संध्याकाळ नादमय

भरतनाट्यम्, कथ्थकची जुगलबंदी
कोल्हापूर : भरतनाट्यम ही दाक्षिणात्य नृत्यशैली - विशेषत: हावभाव, मुद्रा आणि सर्वांगसुंदर प्रकार, तर कथ्थकमध्ये तबला, पढंतच्या तालावर पदन्यास... दोन्ही नृत्यशैलींचे स्वत:चे असे वैशिष्ट्य... परंपरा. पण ना श्रेष्ठतेचा अहंभाव, ना कनिष्ठतेचा न्यूनगंड... या भारतीय नृत्यशैलीला एकाच रंगमंचावर आणत नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि नूपुर रावळ या दोन नृत्यांगनांनी कोल्हापूरकरांची संध्याकाळ नादमय केली. उपज कलामंचच्या वतीने गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिरात या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, उपज संस्थेचे प्रदीप कुलकर्णी, शोभा पाटील उपस्थित होत्या. यावेळी एकाच संगीतावर भरतनाट्यम् आणि कथ्थकचे फ्युजन सादर करून या नृत्यांगणांनी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.कार्यक्रमाची सुरुवात संयोगिता व नूपुर यांनी ‘ओम नमो जी आद्या’ या गीतावरील नृत्याने केली. नूपुरने वंदना, राग-ताल, ठुमरी आणि गतभाव हे कथ्थकमधील नृत्य व तबल्यावरील जुगलबंदी सादर केली. संयोगिता पाटीलने तीन प्रकारचे देवरणाम आणि वर्णम ही पारंपरिक रचना सादर केली. कार्यक्रमाचा शेवट दोघींनी एकाच संगीतावर दोन्ही नृत्यांचे
फ्युजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना गाण्यासाठी संपदा माने, पढंतसाठी उमा आळवेकर, तबल्यावर दीपक दाभाडे, व्हायोलिनवर अमित साळोखे यांनी साथसंगत केली. शरयू बनकर व आरती टोपले यांनी सूत्रसंचालन केले.