‘भारतनिर्माण’चे दप्तर सापडले शौचालयात
By Admin | Updated: January 13, 2016 00:34 IST2016-01-13T00:34:26+5:302016-01-13T00:34:26+5:30
चंदूर येथील प्रकार : झेरॉक्स प्रती सापडल्या, मूळ कागदपत्रे अद्याप गायबच

‘भारतनिर्माण’चे दप्तर सापडले शौचालयात
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील भारतनिर्माण नळ पाणीपुरवठा योजनेच्या गहाळ झालेल्या दप्तराच्या झेरॉक्स प्रती सोमवारी या योजनेच्या ठिकाणी असलेल्या शौचालयात सापडल्या. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसक्षम सदरचे दप्तर ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला. मात्र, ओरिजनल दप्तर, बॅँक पासबुक, चेकबुक कोठे गहाळ झाले आहे? हे अद्याप समजले नाही.चंदूर येथे २००७ साली सुमारे पावणेचार कोटी रुपयांची भारतनिर्माण नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. अतिशय संथगतीने या योजनेचे काम सुरू असून, अद्याप संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. तसेच योजनेतील कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्तांतर झाले.
नवीन पदाधिकाऱ्यांनी भारतनिर्माण योजनेची समिती विशेष सभा घेऊन बदलली. त्यामुळे माजी अध्यक्ष महेश पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतीच्यावतीने सदर योजनेच्या दप्तराची मागणी केली. त्यावेळी त्यांनी दप्तर आपल्याकडे नसल्याचे सांगितले. म्हणून नूतन अध्यक्ष राजेंद्र पाटील व सरपंच विजय पाटील यांनी योजनेचे दप्तर गहाळ झाले असून, संबंधित माजी अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करून दप्तर मिळवून द्यावे, अशी तक्रार जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे केली.
दरम्यान, योजनेचे दप्तर योजनेच्या ठिकाणी असलेल्या शौचालयात असल्याचे पदाधिकाऱ्यांना समजले. मात्र, परस्पर दप्तर काढून घेतल्यास त्यातील कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप होईल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी याबाबत पंचायत समितीला कळवून तेथील अधिकाऱ्यांमार्फत सदरचे दप्तर काढून त्याचा पंचनामा केला. यामध्ये संबंधित योजनेच्या काही फायली आढळल्या. मात्र, त्यामधील कागदपत्रे झेरॉक्स प्रतीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पंचनामा करण्यात आला.
विस्तार अधिकारी एच. एन. खाडे, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कनिष्ट अभियंता एस. बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. बी. जाधव, सरपंच विजय पाटील, पाणीपुरवठा अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, कल्लेश्वर वाघमोडे, शिवगोंडा पाटील, आदींसह उपस्थित होते. (वार्ताहर)