भापकर गुरुजींना कोल्हापूरची साथ
By Admin | Updated: January 29, 2015 23:54 IST2015-01-29T23:49:22+5:302015-01-29T23:54:33+5:30
पंचावन्न हजार जमा : शासनाचा निधी न घेता स्वत:च केला रस्ता

भापकर गुरुजींना कोल्हापूरची साथ
कोल्हापूर : गावकऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी डोंगर फोडून रस्ता बनविणाऱ्या नगरजवळील गुंडेगावच्या ८४ वर्षाच्या राजाराम भापकर गुरुजींच्या कार्याला सलाम करत कोल्हापूरकरांनी जमवलेले ५५ हजार रुपये शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडे सुपूर्द केले. पुढील महिन्यात सन्मानपूर्वक हा निधी गुरुजींना दिला जाईल.
नगरजवळील गुंडेगाव या गावातून कोळगाव या बाजारपेठेच्या जागी जाण्यासाठी वाहन असलेल्या नागरिकांना ३५ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागे. अन्य लोकांना मात्र डोंगरावरील दरडी, ओढे, नाले पार करत कोळगाव गाठावे लागे. हे पाहून भापकर गुरुजींनी डोंगरावरील घाटरस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. पदरी निराशा आल्यानंतर त्यांनी स्वत:च रस्ता बनवायला सुरुवात केली. आपल्या ६० रुपये पगारातली अर्धी रक्कम आणि निवृत्तिवेतनाची रक्कम या कामासाठी देत त्यांनी ४० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर गुंडेगाव ते कोळगाव तसेच ७ किलोमीटरचा घाटरस्ता बांधून पूर्ण केला.
संतोषा डोंगर घाटाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या धावडेवाडीत व गुंडेगावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात जाण्यासाठीचा २६ किलोमीटरचा रस्ता त्यांनी सरकारी मदत न घेता पूर्ण केला. त्यांच्या या कार्याची माहिती शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून भापकर गुरुजींसाठी निधी जमा केला.
मंगळवारी (दि. २७) हा निधी भापकर गुरुजींना सन्मानपूर्वक देण्यात येणार होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापूरला येऊ शकले नाही. त्यामुळे जमलेला ५५ हजारांचा निधी डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याकडे सुपूर्द केला.