भादवणकरांचा नादच खुळा; महालक्ष्मीच्या यात्रेला खास विमानाने गावी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 22:43 IST2025-01-30T22:42:28+5:302025-01-30T22:43:26+5:30

आयुष्यातील संस्मरणीय विमान प्रवास 

bhadvankar arrives for mahalaxmi yatra in the village by special plane | भादवणकरांचा नादच खुळा; महालक्ष्मीच्या यात्रेला खास विमानाने गावी दाखल

भादवणकरांचा नादच खुळा; महालक्ष्मीच्या यात्रेला खास विमानाने गावी दाखल

सदाशिव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, आजरा : जिद्द आणि चिकाटी असली की आपण कांहींही साध्य करू शकतो हे मुंबईकर - भादवण ( ता. आजरा ) ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखविले आहे. महालक्ष्मीच्या यात्रेला येण्यासाठी खास विमानाने आज ३३ जण गावी दाखल झाले. पूर्वी बैलगाडीने तर आता दुचाकी व चारचाकीने पाहुणे मंडळी यात्रेला येतात. पण " भादवणकरांचा नादचं खुळा " महालक्ष्मी यात्रेला विमानाने येऊन आयुष्यातील संस्मरणीय विमान प्रवास केला आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर कार्यरत असणारे आर.बी. पाटील यांनी यात्रेसाठी म्हणून ११ डिसेंबरला ३३ ग्रामस्थांचे विमानाचे तिकीट बुक केले. त्याप्रमाणे आज सकाळी १०.३० वा. सर्वजण मुंबई विमानतळावर दाखल झाले. सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला होता. यात्रेकरुंना आर.बी. पाटील यांनी भगवे टी-शर्ट दिले. आणि आयुष्यातील विमानाच्या संस्मरणीय प्रवासाला सुरूवात  झाली. विमानाने उड्डाण केले आणि विमानामध्येच श्री महालक्ष्मी माता की जय चा जयघोष झाला. कोल्हापूर विमानतळावर सकाळी ११.२० वा. सर्वजण दाखल झाले. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, ग्रामस्थ ज्ञानदेव पाटील, दत्तात्रय शिवगंड, पी.के. केसरकर यांनी स्वागत केले. तेथून स्वतंत्र बसने भादवण गावी दुपारी सर्वजण दाखल झाले. याठिकाणी उपसरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. पहिला विमान प्रवास हा सर्वांसाठी सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. सर्वजण हसतमुख व प्रसन्न चेहऱ्याने आपल्या घरी पोहोचले आहेत. सामूहिक विमान प्रवासाची आठवण त्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.

शाळेच्या मुलींनी केले लेझीमीतून स्वागत 

विमान प्रवासातून यात्रेला आलेल्या सर्व मुंबईकर ग्रामस्थांचे शाळेच्या मुलींनी लेझीम खेळत स्वागत केले. हा अविस्मरणीय क्षण सर्वांनीच डोळ्यात साठवून ठेवला. 

ग्रामस्थांचा महालक्ष्मी यात्रेसाठी सामूहिक हवाई प्रवास घडवून आणण्याचे स्वप्न पाहिले. ग्रामस्थांनीही त्याला साथ दिली. त्यामुळेच आजचा सर्वांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय विमान प्रवास घडवून आणता आला.  आर.बी. पाटील - मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट

Web Title: bhadvankar arrives for mahalaxmi yatra in the village by special plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.