पतीच्या हयातीत ‘निराधार’ पेन्शनचा लाभ
By Admin | Updated: January 16, 2015 00:42 IST2015-01-16T00:40:38+5:302015-01-16T00:42:04+5:30
गडहिंग्लजमधील प्रकार : पतीने केला हयातीचा दाखला सादर; ‘महसूल’कडून चौकशी सुरू

पतीच्या हयातीत ‘निराधार’ पेन्शनचा लाभ
गडहिंग्लज : संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी येथील विवाहित महिलेने चक्क पतीच्या मृत्यूचा दाखला काढला आहे. तब्बल अडीच वर्षांपासून ती पेन्शनचा लाभ घेत आहे. याप्रकरणी महसूल खात्याने चौकशी सुरू केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय पेन्शनचा लाभ घेणाऱ्या या महिलेचे नाव रेणुका सुनील जाधव (रा. हुजरे गल्ली, गडहिंग्लज) असे आहे. हयात असणाऱ्या पतीच्या जागरूकतेमुळेच हा प्रकार उघडकीस आला.येथील हुजरे गल्लीतील रेणुका व तिचे पती सुनील यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे सुनील वारंवार बाहेरगावी राहत. त्यांचा पेंटिंगचा व्यवसाय असून, काही वर्षे ते गोव्यातही होते. अलीकडे चार महिन्यांपासून ते गडहिंग्लजमध्येच पत्नीपासून वेगळे राहत होते. त्यांना मुलगा, मुलगी असून, घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज प्रलंबित आहे.पाच वर्षांपूर्वी रेणुकाने पती सुनील मृत झाल्याची नोंद स्वत: नगरपालिकेत दिली. त्यावरून पतीच्या मृत्यूचा दाखला काढला. त्या दाखल्याच्या आधारे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘निराधार’ पेन्शनसाठी अर्ज केला. स्थानिक चौकशीअंती तिचा अर्ज मंजूर झाला असून, अडीच वर्षांपासून दरमहा ९०० रुपये इतक्या पेन्शनचा तिला लाभ झाला आहे.दरम्यान, रेणुका हिने पेन्शनसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याची माहिती सुनील यांना समजली. त्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करण्याबरोबरच स्वत:चा हयातीचा दाखलादेखील तलाठ्यांकडून घेऊन तहसील कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी महसूल खाते कोणती कारवाई करणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
(प्रतिनिधी)
रेशनकार्डातूनही नाव काढले
पेन्शनच्या लाभासाठी रेणुका हिने आपल्या रेशनकार्डावरून सुनील यांचे नाव कमी करून घेतले आहे. रेशनकार्डावर दोन मुलांसह केवळ तिचेच नाव आहे.
एप्रिल २०१० मध्ये रेणुका हिने नगरपालिकेत स्वत: अर्ज करून पतीच्या मृत्यूची नोंद केली. त्यामध्ये राहत्या घरी २१ जुलै २००९ रोजी पती सुनील यांचा मृत्यू झाल्याची माहिती तिने दिली आहे.
तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या स्थानिक चौकशीअंती रेणुकाच्या पेन्शन मागणीचा अर्ज संजय गांधी निराधार योजना समितीपुढे गेला. समितीच्या मंजुरीनंतर तिला पेन्शन सुरू झाली. त्यामुळे स्थानिक चौकशीतील ‘गोलमाला’बाबतही उलट-सुलट चर्चा आहे.