अल्प दरातील तपासणीचा लाखोंना लाभ
By Admin | Updated: September 1, 2015 23:57 IST2015-09-01T23:57:37+5:302015-09-01T23:57:37+5:30
‘विजय लॅबोरेटरी’चा उपक्रम : गुंदेशा कुटुंबीयांमुळे रुग्णांना दिलासा

अल्प दरातील तपासणीचा लाखोंना लाभ
प्रदीप शिंदे -कोल्हापूर आजारपणासाठी रुग्ण कोणत्याही परिस्थितीत पैसे खर्च करतात, ही मानसिकता ओळखून रुग्णालयात दाखल होताच ताबडतोब रक्त, लघवी अशा किमान पाच-सहा तपासण्या करण्यास सांगितल्या जातातच. आजाराचे गांभीर्य पाहून त्यापुढील इतर विशिष्ट तपासण्या वेगळ्याच. या प्रत्येक तपासणीचे दर पाहून तिथेच रुग्ण व नातेवाईक निम्मे गार होतात. यातूनच सर्वसामान्यांची ‘आजाराचे निदानच राहू दे,’ अशी मानसिकता होते. अशा रुग्णांसाठी अल्पदरांत विविध चाचण्या करण्याकरिता कोल्हापुरातील ‘विजय पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी’ ही नवसंजीवनी ठरत आहे.
कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरातील गुंदेशा कुटुंबीय सराफ व्यावसायिक आहे. आपल्या उत्पन्नामधून समाजासाठी काही खर्च करावा, ही भावना डोळ्यांपुढे ठेवून स्व. भीमराज गुंदेशा यांनी १९८२ साली ‘संघवी भीमराज गुंदेशा चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरू केले. त्यामार्फत ते विविध रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करीत होते. यावेळी असे निदर्शनास आले की, विविध आजारांचे निदान करण्यासाठी ज्या तपासण्या केल्या जातात, त्या आपण अल्पदरात रुग्णांना उपलब्ध करून दिल्यास अनेकांना फायदा होईल. या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी स्व. शांतीलाल गुंदेशा यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ २००६ साली ‘विजया पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी’ सुरू केली.
येथे विविध ५० चाचण्या अत्यंत अल्पदरात करून देण्यास सुरुवात केली. येथे विविध चाचण्यांचे दर दहा रुपयांपासून पुढे आहेत. यामुळे पाहता-पाहता या उपक्रमाला खूप प्रतिसाद मिळू लागला. गेल्या आठ वर्षांत सुमारे एक लाखाहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. फक्त कोल्हापूर शहरवासीयच याचा लाभ घेतात असे नाही, तर निपाणी, कागलसह शहरालगतच्या अनेक भागांतून रुग्ण येथे येतात. आता हा उपक्रम त्यांचे पुत्र अजित व सुनील गुंदेशा चालवीत आहेत. लॅबमध्ये सॅम माजगावकर, अमित गोडबोले, सोनाली पोवार हे काम पाहतात.
सामाजिक बांधीलकीचे धडे आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत. लोकांना मदत केल्याने एक वेगळेच समाधान मिळते. आमचा स्टाफही सेवाभावी वृत्तीनेच या ठिकाणी काम करतो. आतापर्यंत साधारण एक लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. - अजित गुंदेशा
असा आहे पत्ता
विजया पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, प्लॉट नं. ४, महावीरनगर, प्रतिभानगरजवळ. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत ही लॅब खुली असते. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत रिपोर्ट दिला जातो.
येथे या तपासण्या होतात
मलेरिया, मधुमेह, लघवीचे परीक्षण, रक्तगट, रक्त गोठणे, रक्ताचे प्रमाण, थुंकी, शौचपरीक्षण, किडनीसाठी परीक्षण, लिव्हर, संधिवात, शरीरातील क्षार, कॅल्शियम, कावीळ, प्रेग्नन्सी टेस्ट, वीर्य तपासणी, चरबी, प्रोटीनची तपासणी, टायफॉईड, गुप्तरोग, संपूर्ण रक्तघटकांचे प्रमाण, स्वादुपिंडाची तपासणी, हृदयविकार, शरीरातील क्षार, रक्त घट्ट, पातळ, एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, प्रोस्टेट ग्रंथी, स्नायूदुखी, थायरॉईड ग्रंथी, मलेरिया, हॉर्मोन, चिकन गुनिया, पीएसए, आदी रोगांच्या याठिकाणी तपासण्या केल्या जातात.