जयभीमनगरमधील लाभार्थ्यांचा पालिकेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:19+5:302021-09-23T04:26:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गेल्या बारा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही जयभीमनगरमधील १०८ घरकुलांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त ...

जयभीमनगरमधील लाभार्थ्यांचा पालिकेत ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गेल्या बारा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही जयभीमनगरमधील १०८ घरकुलांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी बुधवारी नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या दालनात ठिय्या मारला. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा लाभार्थ्यांनी घेतला. यावेळी नगराध्यक्षांनी शासनाकडून आलेल्या निधीच्या व्याजातून योजनेच्या बांधकामासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याने लाभार्थी शांत झाले.
नगरपालिकेजवळ असलेल्या जयभीमनगर झोपडपट्टीमध्ये शासनाच्या योजनेतून ७२० घरकुले बांधण्यात येणार होती. परंतु, अनेकवेळा मागणी करूनही १२ वर्षांपासून १०८ लाभार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित असून, संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्षा स्वामी यांची भेट घेतली. अनेक वर्षे झाली केवळ आश्वासने देण्यात आली. अजून किती सहन करायचे? किती दिवस भाड्याच्या घरात राहायचे, असा सवाल उपस्थित करत तातडीने घरकुल बांधकाम सुरू करण्याची मागणी केली. येत्या चार ते पाच दिवसांत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक करून या विषयावर मार्ग काढण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. राज्य शासनाकडून घरकुलाच्या बांधकामासाठी आलेल्या निधीतील चार कोटी ५२ लाख रुपये व्याज शिल्लक असून, त्याचा विनियोग बांधकामासाठी करण्याची मागणी मुख्याधिकारी ठेंगल यांच्याकडे केली. मात्र, त्याला शासनाची मंजुरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून लाभार्थ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा नगराध्यक्षांची भेट घेतली. यावेळी नगर अभियंता संजय बागडे यांनी रमाई योजनेतून घरकुलाचा प्रस्ताव देत जातीच्या दाखल्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, लाभार्थ्यांनी त्यास नकार दिला.
फोटो ओळी
२२०९२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत जयभीमनगरमधील लाभार्थ्यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला.