कोल्हापुरात लवकर खंडपीठ करा - संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:45 AM2019-11-19T11:45:49+5:302019-11-19T11:47:05+5:30

कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

 Bench to Kolhapur - Demand for Sanjay Mandalik in Parliament | कोल्हापुरात लवकर खंडपीठ करा - संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

कोल्हापुरात लवकर खंडपीठ करा - संजय मंडलिक यांची संसदेत मागणी

Next
ठळक मुद्देयासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे.

कोल्हापूर : मुंबई हायकोर्ट अंतर्गत सध्या ६५ हजारांच्या आसपास दावे प्रलंबित असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. तेव्हा कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी संसदेत केली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांचे मुंबई हायकोर्टपर्यंतचे अंतर हे ६00 कि. मी. ते ७५0 कि. मी. इतके भरते. या जिल्ह्यांपैकी कोणत्याही एका पक्षकारास मुंबई येथे जावयाचे झाल्यास एका तारखेकरिता एका व्यक्तीस सुमारे पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य पक्षकारांना न परवडणारा असा असल्यामुळे कोल्हापूर येथे लवकरात लवकर खंडपीठ व्हावे, असे मंडलिक म्हणाले.
कोल्हापूरचे दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही या मागणीकरिता संसदेमध्ये व संसदेबाहेर आवाज उठविला असल्याचा उल्लेख करून केंद्र शासनाच्या जसवंत समिती व मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मोहीत शहा यांनी कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिल्याचे मंडलिक यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच १९ जानेवारी २0१९ रोजी मुख्य न्यायमूर्तींकडे महाराष्ट्र शासनानेदेखील कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी निवेदन दिले असल्याचे सांगून पक्षकारांच्या सोईकरिता कमी वेळेत व कमी खर्चात न्याय या धोरणानुसार हे खंडपीठ व्हावे, अशी मागणी मंडलिक यांनी केली आहे.
 
Web Title:  Bench to Kolhapur - Demand for Sanjay Mandalik in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.