बनारसची शस्त्रे साताऱ्यात
By Admin | Updated: October 10, 2014 22:59 IST2014-10-10T22:52:28+5:302014-10-10T22:59:52+5:30
दोघांना अटक : दोन पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर जप्त

बनारसची शस्त्रे साताऱ्यात
सातारा : बनारसहून साताऱ्यात शस्त्रांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अखिलेश उदयप्रताप सिंग-राजपूत (वय २२, मूळ रा. लक्ष्मणपूर पो. चोचकपूर, जि. गाजीपूर, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), नवनाथ नामदेव निकम (वय २०, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाढे फाट्यावरील एका हॉटेलजवळ एक युवक शस्त्रे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तेथे तत्काळ रवाना केले. त्यावेळी अखिलेशला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर, तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
नवनाथ निकम हा शेरेचीवाडी, (ता. फलटण) येथील जोतिबा मंदिराच्या परिसरात कोणाला तरी शस्त्र विकण्यासाठी आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या दोघांकडील शस्त्रांची किंमत २ लाख ५५ हजार रुपये आहे. हे दोघेही शस्त्रांची तस्करी करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.
या दोन्ही कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक शामराव मदने, अनंत चिंचकर, हवालदार पृथ्वीराज घोरपडे, संजय पवार, दीपक मोरे, संजय शिंदे, कांतिलाल नवघणे, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, प्रवीण शिंदे, राहुल कणसे, विक्रम पिसाळ, नितीन शेळके, मुबीन मुलाणी, शरद बेबले, नितीन भोसले, महेश शिंदे, अमित घाटे, संजय वाघ यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
शस्त्रे घेणारे कोण...
शस्त्रांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपींकडून अद्याप समाधानकारक माहिती उघड झाली नाही. ते दोघे कोणाला शस्त्र विकणार होते. त्यांचा नेमका व्यवहार किती रुपयांना ठरला होता, हे तपासात समोर आल्यानंतरच शस्त्रे घेणारे कोण, हे उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.