बेळगाव : जहाजावर आक्षेपार्ह साहित्य सापडले म्हणून जहाजाच्या मालकासह पाच भारतीयांना ग्रीस देशाच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये निपाणी परिसरातील बुधिहाळ येथील सतीश विश्वनाथ पाटील या युवकाचा समावेश आहे.जयदीप ठाकूर, गगदीप कुमार, भूपेंद्र सिंग आणि रोहताश कुमार अशी अन्य चौघांची नावे आहेत. सतीश हा मर्चंट नेव्हीत अभियंता आहे. आपण ग्रीसच्या न्यायालयात अडकलो असून, आम्ही निरपराध आहेत. आमची लवकर मुक्तता करा, अशी मागणी सतीशने केली आहे.अँड्रॉमेडा ग्रीज शिप या कंपनीच्या जहाजावर सतीश सहा महिन्यांपासून काम करतो. १२ जानेवारीला या कंपनीचे जहाज तुर्कस्थानवरून ग्रीसला जात असताना ग्रीसच्या कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले. त्यावेळी या सर्वांना अटक करण्यात आली.प्राथमिक चौकशी वेळीच आक्षेपार्ह साहित्य होते ते जप्त करून मालकालाही अटक झाली. या तरुणांनाही त्या प्रकरणात गोवल्याची तक्रार विश्वनाथ पाटील यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. पत्राच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांनाही पाठवल्या आहेत. तुर्कस्थानावरून इजिप्तकडे जात असताना हे जहाज बिघडले, मालकाने त्याची दुरुस्ती करण्याची सूचना केली. दुरुस्तीनंतर पुन्हा प्रवास सुरु झाल्यावर ग्रीसच्या हद्दीत अटकेची घटना घडली आहे. अटकेनंतर निरपराधांना सोडण्यास ग्रीस सरकार दीड ते दोन वर्षांचा कालावधी घेते. त्यामुळे या सर्वांच्या सुटकेसाठी भारताने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बेळगावचा तरुण ग्रीस पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:17 IST