निपाणीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजीनामे मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:01+5:302021-07-01T04:17:01+5:30
येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ . सीमा गुंजाळ व नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यात लसीकरणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ...

निपाणीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे राजीनामे मागे
येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ . सीमा गुंजाळ व नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यात लसीकरणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर डॉ. गुंजाळ यांच्यसह सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी राजीनामे दिले होते. नगराध्यक्ष भाटले यांनी अपशब्द वापरल्याने हे राजीनामे दिले होते, पण बुधवारी वरिष्ठ आरोग्य अधिकारी व महात्मा गांधी रुग्णालयातील कर्मचारी यांच्यात बैठक झाल्यानंतर हे राजीनामे मागे घेण्यात आले.
निपाणी शहरात पाच ठिकाणी लसीकरण सुरू आहे पण लसीचा पुरवठा अपुरा असल्याने लसीकरणात नियमितता नाही. या कारणावरून भाटले व गुंजाळ यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी भाटले यांनी डॉ. गुंजाळ याना अपशब्द वापरल्याने गुंजाळ याना रडू कोसळले होते. यानंतर त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना आपल्यावर अन्याय होत असल्याचे बोलून दाखवले. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले.
यानंतर बुधवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. एस. गडाद, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी महात्मा गांधी रुग्णालयाला भेट दिली व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला. निपाणी शहरात विविध ठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक केंद्रांवर कमी प्रमाणात लस उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे. त्यानंतर नगराध्यक्ष जयवंत भाटले व डॉ. सीमा गुंजाळ यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा बजावूनसुद्धा लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे सहकाऱ्यांची बैठक घेवून गुंजाळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.