बीडच्या ऊसतोडणी टोळी मुकादमाने घातला ४ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:49+5:302021-03-25T04:22:49+5:30
चंदगड : सदावरवाडी (ता. चंदगड) येथील परशराम नारायण सदावर (वय ४८) या कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक ...

बीडच्या ऊसतोडणी टोळी मुकादमाने घातला ४ लाखांचा गंडा
चंदगड : सदावरवाडी (ता. चंदगड) येथील परशराम नारायण सदावर (वय ४८) या कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक शेतकऱ्याला ऊसतोड करण्यासाठी मजूर पुरवतो, असे सांगून करार, नोटरी करूनही दोन वर्षांत ३ लाच ९८ हजार रूपयांचा गंडा घालणाऱ्या पोपट दैवत घाडगे (रा. ढाकेफळ, ता. केज, जि. बीड) या मुकादमाविरोधात चंदगड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परशराम सदावर यांनी आपल्या ट्रॅक्टरवर ऊसतोड मजूर पुरवठा करण्यासाठी २०१९-२० या हंगामासाठी ४ लाख १० हजार रूपये धनादेशाद्वारे दिल्यानंतरही मुकादम घाडगे याने मजूर पुरवले नाहीत. पुन्हा २०२०-२१ या हंगामात मजूर पुरविण्यासाठी सदावर यांनी आणखी १ लाख रूपये दिले.
मुकादम घाडगे याने २८ ऑगस्ट २०२० रोजी केज (जि. बीड) येथे आपल्याला ५ लाख १० हजार रूपये पोहोचल्याचे नोटरी करारपत्र करून दिले आहे. त्यानंतर ट्रक्टर मालक सदावर हे मजूर टोळी आणण्यासाठी केज येथे गेले असता, ८० हजार रूपये रोख दिले. परंतु, करारामध्ये ठरल्याप्रमाणे मुकादम याने १४ मजूर (सात कोयते) न देता फक्त ८ मजूर (चार कोयते) पुरवले. या आठ ऊसतोड मजुरांनी दोन महिन्यात फक्त १ लाख ९२ हजार रूपयांचे काम केल्याने त्यांच्याकडे ३ लाख ९८ हजार रूपये शिल्लक असताना काम निम्म्यावर सोडून मुकादम घाडगे हा मजुरांसह पळून गेला.