शिपाई ते बँकेचा संचालक व्हाया ‘वाहक’

By Admin | Updated: June 3, 2015 01:00 IST2015-06-03T00:32:41+5:302015-06-03T01:00:45+5:30

स्टेट ट्रान्स्पोर्ट बँक निवडणूक : वाहक वसंत पाटील यांची वाटचाल

Become the operator of the bank from the 'carrier' | शिपाई ते बँकेचा संचालक व्हाया ‘वाहक’

शिपाई ते बँकेचा संचालक व्हाया ‘वाहक’

कोल्हापूर : कामगार संघटनेच्या कार्यालयात शिपाई या पदावर काम करत एस. टी.मध्येच वाहक या पदावर रुजू झालेले वसंत पाटील यांनी स्टेट ट्रान्स्पोर्ट को-आॅप. बँकेच्या (एस. टी. बॅँक) संचालकपदावर मजल मारली आहे. संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविणाऱ्या वसंत पाटील यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची बॅँकेच्या संचालकपदावर झालेली निवड एस.टी.तील सर्वच कर्मचाऱ्यांना उर्मी देणारी ठरत आहे.वसंत पाटील मूळचे नणुंद्रे (ता. पन्हाळा) येथील. ते एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होते. शिपाई म्हणून सहा वर्षे काम केल्यानंतर ते एस.टी.मध्ये वाहक या पदावर रुजू झाले. त्यानंतर संघटनेचे आगार सेक्रेटरी, विभागीय अध्यक्ष, सचिव या पदावर काम करत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम केल्याने त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती.
या वर्षीची स्टेट ट्रान्स्पोर्ट को-आॅप. बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निवडणुकीत चार पॅनेल रिंगणात होते. बँकेच्या स्थापनेपासून मान्यताप्राप्त एस.टी. कामगार संघटनेची एस.टी. बँकेवरील असणारी मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सर्व संघटनांच्यावतीने जोरदार कंबर कसली होती.
निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड, मनसे एस. टी. कामगार सेनेचे राज्याध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी मेळावा घेऊन या मान्यताप्राप्त संघटनेवर जोरदार टीका केली होती. मात्र, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे १९ उमेदवार निवडून येऊन विरोधकांना चोख उत्तर दिले. कोल्हापूर विभागातील उमेदवार वसंत पाटील यांना राज्यात २९,६७० मते मिळाली, तर कोल्हापूर विभागातून त्यांनी एक हजार मतांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. (प्रतिनिधी)


विजयी उमेदवार असे -
सर्वसाधारण गट: वसंत पाटील, प्रवीण बोनगिरवार, मुकेश गिरधर, योगराज पाटील, जयवंत जाधव, विजय पवार, शिवाजी कडूस, विनय राणे, राजेंद्र मोटे, विजय साबळे, दिलीप परब, सुभाष वंजारी, रामचंद्र पाटील, विकास योगी. महिला गट : वैजयंती भोसले, लाडूताई मडके. अनुसूचित जाती-जमाती : नारायण सूर्यवंशी, दशरथ विसे. भटक्या विमुक्त जाती-जमाती : बंडू बारगजे.


सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी बँकेत काम करणार आहे. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यांना कर्जाचे पासबुक मिळवून देणार, मृतांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार आहे. गृहकर्जाची कागदपत्रे कमी करून कोअर बँकिंग सेवेसाठी प्रयत्नशील राहीन. निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता त्यांना चोख उत्तर दिले आहे. - वसंत पाटील, नूतन संचालक

कोल्हापूर विभागातील संचालक
कोल्हापूर विभागातून आतापर्यंत एस.टी. बँकेच्या संचालकपदी एन. एस. पाटील, एस. डी. सुतार, एस. बी. काझी, बाबा लिंग्रज, शिवाजीराव भोसले, किरण आयरेकर यांची निवड झाली असून, वसंत पाटील हे सातवे संचालक बनले आहेत.

Web Title: Become the operator of the bank from the 'carrier'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.