विशाल बनगे मृत्यूची फेरचौकशी करा
By Admin | Updated: February 26, 2016 01:20 IST2016-02-26T01:18:21+5:302016-02-26T01:20:29+5:30
दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण : वडिलांच्या तक्रारीवर न्यायालयाचे पोलिसांना आदेश

विशाल बनगे मृत्यूची फेरचौकशी करा
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर रजपूतवाडी येथे विशाल सुभाष बनगे (वय २४, रा. बुधवार पेठ पोलीस लाईन) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. करवीर पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची नोंद स्टेशन डायरीला केली आहे.
विशालचा खून केल्याची तक्रार त्याचे वडील सुभाष सायाप्पा बनगे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केल्याने न्यायालयाने फेरचौकशी करण्याचे आदेश करवीर पोलिसांना दिले आहेत. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर दि.३ जुलै २००५ रोजी विशाल बनगे हा मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची नोंद केली. विशालचे वडील गांधीनगर पोलीस ठाण्यात साहाय्यक फौजदार होते. त्यांनी मुलाचा अपघाती मृत्यू नसून प्रेमप्रकरणातून त्याचा खून केल्याची तक्रार केली होती; परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी संशयित आरोपी पोलीस हवालदार राजाराम पाटील, त्यांची पत्नी सुशीला, अतुल पाटील, हरी पाटील, विकास जरग, सखाराम चव्हाण, डॉ. सडोलीकर यांच्या विरोधात दि. ९ जुलै २००५ रोजी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने करवीर पोलिसांना फेरतपासाचे आदेश दिले. गेली दहा वर्षे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद ढोमे यांनीही तक्रारदार सुभाष बनगे यांना २ फेब्रुवारी २०१६ रोजी या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे लेखी पत्र दिले आहे. या गुन्ह्यामध्ये नेमका काय तपास झाला, कोणाचे जबाब घेतले, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयास सादर केला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)