सौंदत्तीच्या गाड्या उद्या सुटणार

By Admin | Updated: December 21, 2015 00:38 IST2015-12-21T00:09:28+5:302015-12-21T00:38:15+5:30

१६१ एस.टी. बसेस बुकिंग : यात्रेकरूंच्या सुविधेत वाढ; सीसी कॅमेऱ्यांचा ‘वॉच’

Beauty trains will leave tomorrow | सौंदत्तीच्या गाड्या उद्या सुटणार

सौंदत्तीच्या गाड्या उद्या सुटणार

कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे तीन दिवस होत असलेल्या श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर शहरातून १६१ एस. टी. बसेस बुकिंग झाल्या आहेत. याशिवाय खासगी वाहनांतून हजारो भाविक उद्या, मंगळवारी यात्रेसाठी रवाना होत आहेत. मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस ही यात्रा होत आहे. गुरुवारी (दि. २४) मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून यादिवशी सुमारे पाच लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल होतील.
कोल्हापूर शहरातून या यात्रेसाठी आज, सोमवारी दहा एस. टी. बसेस भाविकांना घेऊन रवाना होत आहेत, तर उद्या पहाटे १५१ एस. टी. बसेस रवाना होत आहेत. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. याशिवाय बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जुगुळबाई परिसर, सौंदत्ती डोंगरावर ऐनीकुंड व रेणुकादेवी मंदिर परिसरात काही प्रमाणात सुविधांची वाढ केली आहे.
‘उदं गं आई उदं’चा गजर करत उद्या सर्व एस. टी. बसेस सौंदत्ती यात्रेसाठी रवाना होत आहेत. यंदाच्या वर्षी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आगार येथून २५, संभाजीनगर बसस्थानक आगार येथून १३१, तर कर्नाटक सरकारच्या पाच बसेस भाविकांनी रविवारअखेर बुकिंग केल्या आहेत. या बसेस बुकिंगचा कालावधी संपला आहे. कर्नाटकच्या बुकिंग केलेल्या पाच बसेस या दुधाळी, मंगळवार पेठ या परिसरातील ग्रुपने बुक केल्या आहेत. विशेष म्हणजे, शहरातील पेठा-पेठांतील बहुतांश गल्ल्यांतून या बसेस रवाना होतात. भंडाऱ्याची उधळण, ‘उदं गं, आई उदं’चा गजर करत सजविलेल्या या सर्व बसेसमधून भाविक रवाना होतात. सौंदत्ती डोंगरावर जाणाऱ्या भाविकांत ८० टक्के भाविक हे महाराष्ट्रातील, तर केवळ २० टक्के भाविक हे कर्नाटकातील असतात.
महाप्रसादाचे आयोजन
कोल्हापुरातून उद्या सकाळी सहा वाजल्यापासून भाविक एस.टी.द्वारे यात्रेसाठी जाणार आहेत. घटप्रभा कॅनॉल येथे माजी आमदार मालोजीराजे यांच्यातर्फे रेणुका भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, तर कागल येथे लक्ष्मी टेकडी लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर प्रसादाचे लाडू वाटप करण्यात येते. महाप्रसादानंतर जोगुळाभावी कुंड या ठिकाणी लिंब नेसण्याचा विधी होणार आहे. त्यानंतर भाविक सौंदत्ती डोंगर येथे दर्शनासाठी जाणार आहेत.

सुविधांत काही प्रमाणात वाढ
सौंदत्ती येथे यात्रेकरूंची प्रत्येक वर्षी गैरसोय होते. यंदाही या गैरसोयींना सामोरे जावे लागू नये, यासाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी एन. जयराम यांची यापूर्वीच भेट घेऊन भविकांना सुविधा देण्याची मागणी केली होती.
त्यावेळी त्यांनी जास्तीत जास्त सुविधा देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार जुगुळबाई देवीच्या मंदिरानजीक कुंडात पाणी कमी असल्याने येथे यंदा
प्रथमच शॉवरवर अंघोळ करण्याची सोय केली आहे.
सौंदत्ती डोंगरावर स्टँड ते मंदिर मार्गाचे यंदा मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण केले आहे. मंदिरानजीक दर्शनरांग आणि ऐनीकुंडावर अंघोळ करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण दरवर्षी असते. त्यावर आळा घालण्यासाठी या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे चोरट्यांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.
सौंदत्ती देवस्थानचे सचिव ग्रामोपाध्ये यांनी डोंगरावर स्वच्छता राखण्यासाठी जादा कर्मचारी तैनात केले आहेत. शौचालयांची संख्या वाढविली नसली तरी फिरती शौचालये या ठिकाणी जादा प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत.

Web Title: Beauty trains will leave tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.