समाधान घोडकेने मारले पेठचे मैदान
By Admin | Updated: February 26, 2015 00:47 IST2015-02-26T00:32:03+5:302015-02-26T00:47:40+5:30
कुस्ती मैदान : खुडेकडून केचे पराभूत

समाधान घोडकेने मारले पेठचे मैदान
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील श्री माणकेश्वर व श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात समाधान घोडके याने अण्णा कोळेकर यास डंकी डावावर चितपट करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याचा एक लाख रुपये बक्षीस व कायम शिल्ड देऊन गौरव करण्यात आला.मैदानाचे पूजन उपसरपंच संदीप पाटील, मोहन मदने यांच्या हस्ते करण्यात आले. द्वितीय क्रमांकाची लढत जयकर खुडे व नितीन केचे यांच्यात झाली. २० मिनिटांच्या झटापटीनंतर जयकर खुडेने नितीनला अस्मान दाखवले, तर दुसऱ्या लढतीत संतोष सुतार याने सूरज निकमवर विजय मिळवला. जयकर व संतोष यांना ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांकाची बापू यमगर विरुद्ध सचिन शेवतकर यांच्यातील लढत बरोबरीत सोडविण्यात आली. यावेळी विश्रांती पाटील विरुद्ध जस्मीन शेख यांच्यात कुस्ती लावण्यात आली. यामध्ये जस्मीन शेख विजयी झाली.
मैदानात इतरही लहान-मोठ्या शंभरावर कुस्त्या झाल्या. त्यात विवेक नायकल, राहुल पाटील, सागर पवार, सूरज शेलार, योगेश शेलार, नितीन उथळे, सुरेश जाधव यांनी विजय मिळवला. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, राहुल महाडिक, संतोष वेताळ, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, सरपंच सुनीता पवार, उपसरपंच संदीप पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोहनराव मदने, जि. प. सदस्य रणधीर नाईक, हणमंतराव पाटील, नंदकुमार पाटील, डॉ. बी. के. शेटे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, संपतराव पाटील, फिरोज ढगे उपस्थित होते.
भरत नायकल, कृष्णात पवार, बबन शिंदे, माणिक जाधव, बबन सावंत, दिनकर शिंदे, सम्राट महाडिक, जयराज मदने यांनी पंच म्हणून काम पाहिले. ईश्वरा पाटील, शहाजी चव्हाण यांनी समालोचन केले.