‘पॅट्रियट’ची पीटीएम ‘ब’ वर मात
By Admin | Updated: November 25, 2014 00:43 IST2014-11-25T00:41:18+5:302014-11-25T00:43:39+5:30
केएसए लीग : खंडोबा-शिवनेरी बरोबरी

‘पॅट्रियट’ची पीटीएम ‘ब’ वर मात
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित ‘ए’ डिव्हीजन फुटबॉल लीग स्पर्धेच्या आज, सोमवारी झालेल्या सामन्यात पॅट्रियट स्पोर्टस्ने पीटीएम ‘ब’वर २-० ने मात केली, तर खंडोबा तालीम मंडळ वि. शिवनेरी स्पोर्टस् यांच्यातील सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला.
शाहू स्टेडियम येथे पॅट्रियट स्पोर्टस् विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यामध्ये पहिला सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासूनच पॅट्रियट स्पोर्टस्ने सामन्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रजत शेट्टी, लक्ष्मण पाटील, अतुल पोतदार यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, पीटीएम ‘ब’च्या मयूर पाटील, गणेश पाटील, संग्राम शिंदे यांनी त्यांच्या चढाया परतून लावल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात सामन्याच्या सुरुवातीलाच पॅट्रियटच्या सैय्यद नैयमुद्दीनने गोल करत संघाचे खाते उघडले. या आघाडीची बरोबरी करण्यासाठी पीटीएम ‘ब’कडून संग्राम शिंदे, मयूर पाटील, श्रीनिवास नारंगीकर यांनी प्रयत्न केला, पण समन्वयाअभावी त्यांच्या चढाया फोल ठरल्या. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ‘पॅट्रियट’च्या सैय्यद मौनुद्दिनने गोल करत सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत अबाधित राहिली.
खंडोबा-शिवनेरी यांच्यात १-१ अशी बरोबरी
दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. अत्यंत वेगवान झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ‘खंडोबा’कडून कपिल साठे, चंद्रशेखर डोका, श्रीधर यादव, अर्जुन साळोखे यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘शिवनेरी’चा गोलकिपर अल्ताफ हकिमने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. सतत होणारे आक्रमण रोखण्यासाठी शिवनेरी स्पोर्टस्कडून इंद्रजित पाटील, दीपराज राऊत, युवराज पाटोळे, सूरज जाधव यांनी खोलवर चढाया केल्या. मात्र, त्यांना या चढाईचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना खाते उघडता आले नाही.
उत्तरार्धात खंडोबा तालीम मंडळाचा खेळाडू अर्जुन शितगावकरने अनेक खोलवर चढाया करत शिवनेरीच्या बचावफळीची दमछाक करण्यास सुरुवात केली. ४४ व्या मिनिटाला शिवनेरी स्पोर्टस्चा खेळाडू व्हेलेना सिओने ‘खंडोबा’ संघाची बचावफळी भेदत उत्कृष्ट गोल करत सामन्यात १-० ने आघाडी घेतली. या आघाडीनंतर ‘शिवनेरी’ने बचावात्मक खेळी केली तर ‘खंडोबा’ संघाकडून आक्रमणपणा कायम ठेवला. त्यामध्ये ‘खंडोबा’ संघाला ७९ व्या मिनिटाला यश आले. त्यांच्या चंद्रशेखर डोकाने मोठ्या डीतून मारलेल्या फटक्याने गोल पोस्टचा अचूक वेध घेतला. ही बरोबरी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
आजचे सामने
दुपारी २ वाजता दिलबहार ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम
दुपारी ४ वाजता पीटीएम ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी तालीम मंडळ.
अचूक निर्णयांसाठी पंचांनीही कंबर कसली
कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामात कोणत्याही फुटबॉल संघाला पंचांच्या निर्णयांबद्दल तक्रार करता येऊ नये, याकरिता कोणता निर्णय कसा घेतला जातो, याची प्रात्यक्षिकेच कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनच्यावतीने नुकतीच शाहू स्टेडियमवर दाखविण्यात आली. असोसिएशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापूर फुटबॉल विश्वाच्या आतापर्यंतच्या इतिहासात अचूक निर्णयासाठी जणू पंचांनीही कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.
एखाद्या सामन्यात पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून निकालाचे खापर ‘त्या’ पंचांवर फोडले जायचे. त्यातून अनेक वाद, शंका आणि तक्रारींचा सूर रेफ्रीबद्दल उमटत होता. मात्र, आता असा निर्णय का घेतला. त्याबद्दल आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन व मुंबई रेफ्ररी असोसिएशन यांच्या नियमावलींचा जणू वर्गच मागील बुधवारी घेतला गेला. त्यामध्ये ‘फिफा’ने घालून दिलेली आदर्श प्रणाली व आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नियम याबद्दल शाहू स्टेडियम येथे पंचांनी संघांच्या व्यवस्थापनातील जबाबदार तीन व्यक्तींच्या विविध शंकांचे समाधान केले.