हंगाम १५ ऑक्टोबरपुर्वी सुरु होणार नाही याची दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:58+5:302021-09-18T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने आगामी गळीत हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ...

हंगाम १५ ऑक्टोबरपुर्वी सुरु होणार नाही याची दक्षता घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाने आगामी गळीत हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने सीमा भागात आहेत. त्यामुळे तत्पूर्वी हंगाम सुरु होणार नाही, याची दक्षता घ्या. अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. सहकारी संस्थांच्या निवडणुका, लेखापरीक्षणासह इतर आढावाही त्यांनी घेतला.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे शुक्रवारी खासगी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी सहकार विभागाचा धावता आढावा घेतला.
सध्या राज्यात पावणे दोन वर्षे थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. कोल्हापुरातील निवडणुकांबाबत मंत्री पाटील यांनी माहिती घेतली. यावर, जिल्ह्यात डिसेंबर २०२०अखेर ४,१२० सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी ६२४ संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांना खरीप पीक वाटपाचा आढावा घेत जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप कसे होईल, याकडे लक्ष द्या. कर्ज वसुली व थकबाकीबाबत विचारणा करत वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. लेखापरीक्षणाची वाढवलेली मुदत आणि सध्याची परिस्थिती याची माहिती त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) छत्रीकर, विभागीय उपसंचालक (साखर) एस. एन. जाधव, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील, करवीरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील, साखर सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक रमेश बारडे आदी उपस्थित होते.
‘सहकार भवन’चा पाठपुरावा करा
कोल्हापुरात भूविकास बँकेच्या इमारतीमध्ये नियोजित सहकार भवनाचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे आहे. याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांना दिल्या.