सावधान ! ‘व्हॉटस् अॅप’ हाताळताय...--सिंहावलोकन
By Admin | Updated: October 7, 2014 00:02 IST2014-10-06T23:59:07+5:302014-10-07T00:02:49+5:30
आक्षेपार्ह मजकूराबाबत नोटीस येईल

सावधान ! ‘व्हॉटस् अॅप’ हाताळताय...--सिंहावलोकन
एकनाथ पाटील -- कोल्हापूर --विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उमेदवारांविरोधात ‘व्हॉट्स अॅप’वरून बदनामीकारक, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात आहे. दोन्ही गटांत तेढ निर्माण होत आहेत. अशा प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. अशा मजकुरासंबंधी तक्रार दाखल झाल्यास संबंधित व्यक्तींवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता ‘कलम १४९’ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे.
निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या. ‘हायटेक प्रचार प्रणाली’ म्हणून ‘व्हॉट्स अॅप’ आणि ‘फेसबुक’चा वापर होत आहे. फेसबुकवरून प्रसारित होणारी अनेक वादग्रस्त छायाचित्रे आणि संदेशांमुळे यापूर्वी राज्यात दंगली घडल्या आहेत. आता तरी मोबाईलवरील ‘व्हॉट्स अॅप’ने प्रत्येकाला वेड लावले. कुणी टाइमपास म्हणून, तर कुणी व्यवसायासाठी त्याचा वापर करीत आहे. परंतु चांगल्यासाठी कमी आणि गैरकृत्यांसाठी जास्त असा वापर होऊ लागल्याचे सध्याचे चित्र आहे. आता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाचा ‘व्हॉट्स अॅप’ प्रचारयंत्रणेकडून वापर सुरू आहे. लोकांचे मतपरिवर्तन करण्यासारखे संदेश व छायाचित्र पाठविले जात आहेत; तर दुसरीकडे विरोधी उमेदवाराला चितपट करण्याच्या दृष्टीने संदेश तयार करून तो प्रसारित केला जाऊ लागला आहे. त्यातून वादावादीचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. विनोदी मजकूरातूनही उमेदवारांची बदनामी करणारा मजकूर छायाचित्रासह प्रसारित केला गेला आहे.
आमदार नरके यांची बदनामी : अज्ञातावर गुन्हा
पन्हाळा तालुक्यातील कळे (खेरिवडे) येथे बालिकेवरील अत्याचार प्रकरण आमदार चंद्रदीप नरके यांनी मध्यस्थी करून दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्यांच्याविरोधात ‘व्हॉट्स अॅप’वरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. नरके यांचे कार्यकर्ते अभिजित हावळ यांनी याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलीस पाठवणार अशी नोटीस आपल्या ‘व्हॉट्स अॅप’ अकौंटमार्फत इतर लोकांचे ‘व्हॉट्स अॅप’वर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. इकडील पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त आहे. सद्या आक्षेपार्ह मजकुरामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी ‘व्हॉट्स अॅप’ सदस्यांमार्फत असा आक्षेपार्ह मजकूर अथवा चित्र प्रसारित केल्यास सदस्यांना सर्वस्वी जबाबदार धरुन आपणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.’
‘व्हॉट्स अॅप’चा चांगला कामांसाठी वापर न होता आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ लागला आहे. एखाद्याने तक्रार दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा
(पोलीस अधीक्षक)