‘बीसीयूडी’च्या संचालकपदी डी. आर. मोरे
By Admin | Updated: July 5, 2015 00:59 IST2015-07-05T00:59:19+5:302015-07-05T00:59:19+5:30
शिवाजी विद्यापीठाकडून घोषणा : चांगले योगदान देण्याची ग्वाही

‘बीसीयूडी’च्या संचालकपदी डी. आर. मोरे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या (बीसीयूडी) संचालकपदी येथील शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांची विद्यापीठाने शनिवारी निवड केली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मोरे यांचे स्वागत केले.
या पदासाठी मोरे यांच्यासह राजाराम कॉलेजचे प्राचार्य वसंत हेळवी, प्राचार्य बी. एन. पवार, प्राचार्य प्रवीण चौगुले यांचे अर्ज होते. त्यातून कुलगुरुनी मोरे यांची निवड केली. डॉ.अर्जुन राजगे यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांची उत्तरोत्तर प्रगती साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहीन. त्याचप्रमाणे विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन ३.१६ सीजीपीएसह प्राप्त झाले आहे. त्याहून अधिक मानांकन मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन ते साध्य करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ग्वाही डॉ. मोरे यांनी निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात दिली. व्यवस्थापन परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मोरे हे आपल्या अनुभवाच्या बळावर बीसीयूडी’चे संचालक म्हणून विद्यापीठाच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक वाटचालीमध्ये उत्कृष्ट योगदान देतील. त्यांच्या विद्यापीठ प्रशासन, कायदा आणि नियमांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा विद्यापीठाला निश्चितपणे लाभ होईल.
या प्रसंगी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्र्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एच. एन. मोरे, डॉ. के. ए. माळी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)