बावड्यातील अभियंता एस.टी.च्या धडकेत ठार

By Admin | Updated: December 20, 2015 01:42 IST2015-12-20T01:37:41+5:302015-12-20T01:42:43+5:30

कऱ्हाडजवळ अपघात : दुचाकीला मागून ठोकरले

Bawadi engineer killed in ST | बावड्यातील अभियंता एस.टी.च्या धडकेत ठार

बावड्यातील अभियंता एस.टी.च्या धडकेत ठार

मलकापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर एसटीची दुचाकीला धडक बसून तरुण अभियंता जागीच ठार झाला. मलकापूरच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
तुषार तानाजी सूर्यवंशी (वय ३०, रा. मलकापूर, मूळ रा. कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील तुषार सूर्यवंशी हा युवक स्थापत्य अभियंता (बी. ई. सिव्हील) असून, सध्या तो मलकापुरातील ‘सी. बी. कन्स्ट्रक्शन’ या कंपनीत नोकरीस होता. सुमारे तीन वर्षांपासून तो नोकरीनिमित्त मलकापुरात वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे विठ्ठलदेव सोसायटीमधील कंपनीच्या कार्यालयात गेला. कार्यालयातील काम आटोपून काही वेळानंतर तो कामानिमित्त कऱ्हाडकडे जाण्यासाठी निघाला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो उपमार्गावर एका शॉपसमोर पोहोचला असताना पाठीमागून आलेल्या एसटीने (एमएच १४ बीटी ०८३३) त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तुषार दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीला आले. त्यांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. मात्र, त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू
झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.
काही वेळातच दुसरा अपघात
ज्या ठिकाणी एसटी व दुचाकीचा अपघात झाला, त्याच ठिकाणी काही वेळात दुसरा अपघात झाला. मालवाहतूक रिक्षाने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातानंतर नागरिकांनी रिक्षाचालकाला बेदम चोप दिला. घटनेची नोंद कऱ्हाड पोलिसांत झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Bawadi engineer killed in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.