बांबवडे पशुवैद्यकीय रुग्णालयात गैरसोयी
By Admin | Updated: July 14, 2014 01:11 IST2014-07-14T01:03:48+5:302014-07-14T01:11:42+5:30
सुविधांचा अभाव : पशुवैद्यकीय अधिकारी नाही

बांबवडे पशुवैद्यकीय रुग्णालयात गैरसोयी
रामचंद्र पाटील - बांबवडे
दहा हजारांपेक्षा जास्त पशुधनाच्या उपचारासाठी असलेल्या बांबवडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांच्या कमतरतेसह इतरही सुविधांचा अभाव असल्याने हा दवाखानाच व्हेंटिलेटरवर आल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना वालीच राहिलेला नाही.
पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत २००५ सालापासून तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय शाहूवाडी हा दवाखाना बांबवडे येथे कार्यरत आहे. या अगोदर येथे जिल्हा परिषदेचा दवाखाना होता. त्यामध्ये जनावरांना उपचार करताना मर्यादा येत होत्या. जनावरांचे गंभीर आजार व शस्त्रक्रिया येथे होत नव्हत्या; परंतु ज्या गरजेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध होत्या, त्या चांगल्या पद्धतीने होत होत्या.
या दवाखान्याचे तालुका पशुवैद्यकीय केंद्रात रूपांतर झाले आणि दवाखाना सुरू झाल्यापासून तो नेहमीच समस्येच्या विळख्यात सापडला आहे.
तालुक्यासाठी असणारे हे पशुचिकित्सालय जागेच्याअभावी मध्यवर्ती ठिकाण म्हणून बांबवडे येथे घेण्यात आले. या परिसरातील १७ गावे व त्याच्या दुप्पट वाड्या, वस्त्या असे याचे कार्यक्षेत्र आहे. येथे नवीन इमारत, निवासस्थान यासाठी १.५ कोटींची योजना शासनाच्या लालफितीत अडकून पडली आहे. आता येथे जी इमारत आहे ती पूर्वी धर्मशाळा म्हणून वापरात आणली जायची. त्यानंतर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र काही काळ सुरू होते. आता दोन दशकांहून अधिक काळ येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे.
एकूण ३० गुंठे जागा सातबाऱ्यावर नोंद आहे. प्रत्यक्षात ती आता निम्मीसुद्धा भरत नाही. इमारतीची पडझड झाली आहे. रिकामी जागा खासगी वडापच्या वाहनांचा तळच बनला आहे. दवाखान्याची अशी स्थिती पाहून नवीन इमारत त्यामध्ये प्रयोगशाळा, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, स्वतंत्र निवासस्थान असे मोठे रुग्णालय येथे उभारण्यासाठीचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे लालफितीत आजही अडकून पडला आहे. स्थानिक प्रशासन यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांना वरील पातळीवर मदतीची गरज आहे; परंतु सध्या उपलब्ध सुविधा आहेत त्याही शेतकऱ्यांना डॉक्टरांअभावी मिळू शकत नाहीत.