तासगाव बाजार समितीत वर्चस्वाची लढाई
By Admin | Updated: June 12, 2015 00:31 IST2015-06-12T00:09:47+5:302015-06-12T00:31:28+5:30
एक आॅगस्टला मतदान : १९०४ मतदार; १९ जागा; राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसचे इच्छुक सरसावले

तासगाव बाजार समितीत वर्चस्वाची लढाई
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु झाली आहे. १९ जागांसाठी निवडणूक होणार असून १९०४ मतदार आहेत. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या गटाची संयुक्त सत्ता होती. बाजार समितीचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आघाडी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून संचालक मंडळाऐवजी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० जून ते २४ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २६ जूनला नामनिर्देशन छाननी, २७ जूनला प्रसिध्दी होणार आहे. १३ आणि १४ जुलैला अर्ज माघारसाठी मुदत आहे. १५ जुलैला उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. २ आॅगस्टला निकाल जाहीर होणार आहे.
एकूण १९ जागांसाठी मतदान होणार आहे. सहकारी संस्थांतील ११ पैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७, इतर मागास प्रवर्गासाठी १, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी १ आणि महिला प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित आहेत. ग्रामपंचायत गटासाठी ४ जागा असून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमातीसाठी १ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी १ जागा आरक्षित आहे. व्यापाऱ्यांसाठी १, हमाल-तोलाईदारांसाठी १ जागा आहे. कृषी, प्रक्रिया उद्योग मतदार संघासाठी १ जागा आहे. संस्थांत १, तर व्यापारी गटात ४ मतांची वाढ झाली आहे.
बेदाण्याची कोट्यवधीची उलाढाल आणि तालुक्यातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे बाजार समितीवर संचालकपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मोठी ताकद असल्यामुळे या दोन पक्षांकडून बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे.
राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली असली तरी, आघाडी होण्याच्या बाबतीतही ती दिसून येत आहे. त्यामुळे तीन स्वतंत्र पॅनेल लागणार, की जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्यानुसार आघाडीचे राजकारण होणार, याचे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)