‘जनसुराज्य’साठी ‘करो या मरो’ची लढाई

By Admin | Updated: February 15, 2017 00:54 IST2017-02-15T00:54:03+5:302017-02-15T00:54:03+5:30

‘शेकाप’ ‘जनता दल’चे अस्तित्व पणाला : स्थानिक आघाड्यांना हवा करण्यात यश; सत्तेच्या सारीपाटात येणार महत्त्व

The battle for 'JanaSurajya' is to die | ‘जनसुराज्य’साठी ‘करो या मरो’ची लढाई

‘जनसुराज्य’साठी ‘करो या मरो’ची लढाई

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --एकेकाळी चार आमदार व राज्यभर नेटवर्क असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला या निवडणुकीत अस्तित्वासाठी झुंजावे लागत आहे. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातंर्गत आलेली मरगळ झटकून जिल्हा परिषद व पंचायत समितीत पक्षाध्यक्षांनी कंबर कसली असली तरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच राहणार आहे. इतर छोटे-छोटे पक्ष व आघाड्यांनी या निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच हवा केली असून ही हवा मतदान यंत्रांपर्यंत पोहोचली तर सत्तेच्या सारीपाटात या आघाड्यांना महत्त्व येणार आहे.
जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी स्थापनेवेळीच चार आमदार निवडून आणत राज्यात दबदबा निर्माण केला. या ताकदीवरच पाच वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. कोल्हापूर महापालिकेची सत्ताही पक्षाच्या ताब्यात राहिली. ‘विनय कोरे यांना वगळून जिल्ह्याचे राजकारण करणेच अशक्य,’ अशी हवा पक्षाने निर्माण केली होती. इतर राजकीय पक्षांना चांगला पर्याय म्हणून जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या; पण ही हवा फार काळ टिकली नाही. २००९ ला फक्त दोन आमदार निवडून आले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील स्वत: कोरेंचा समावेश होता. महापालिकेबरोबर राज्यातील सत्तेतही वाटा नसल्याने पक्षाची गोची झाली. या कालावधीत पक्षांतर्गत मोठी पडझड झाली. त्याचा फटका सन २०१४ च्या विधानसभेला बसला. राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या पक्षाची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. भाजपसोबत आघाडी केली असली तरी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या ‘स्वाभिमानी’, ‘ताराराणी’ यांच्याशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत. त्याचा फटकाही या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. विद्यमान सभागृहात पक्षाचे सहा सदस्य आहेत. आता पक्षाच्या चिन्हावर चौदा ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. बालेकिल्ला असलेल्या पन्हाळा तालुक्यात सर्व विरोधकांनी त्यांना घेरल्याने तिथे गेल्यावेळच्या चार जागा राखतानाही दमछाक उडणार आहे.
दोन्ही काँग्रेसला खिंडार पाडत भाजपला रसद पुरविणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘ताराराणी’आघाडी रिंगणात उतरली आहे. आघाडीचे सहा उमेदवार असून त्यापैकी तिघांनी इतर पक्षांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, नंदिनी बाभूळकर व गोपाळराव पाटील यांच्या ‘युवक क्रांती’ने चंदगड चार व हातकणंगलेत दोन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाने ‘करवीर’मध्ये तीन, तर चंदगड व शाहूवाडी तालुक्यात प्रत्येक एक असे पाच उमेदवार उभे केले आहेत. जनता दलाने बड्याचीवाडी व सरवडे या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. भारिप बहुजन महासंघ, बहुजन मुक्ती पार्टी, बसपा, रासप, मनसे, माकप, ब्लॅक पॅँथर, ‘रिपाइं’ या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत.
निवडणुकीचा रागरंग पाहिला तर कोणत्याही एका पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता येणार नाही, हे निश्चित आहे. दोन पक्ष एकत्र आले तरीही सत्तेची ३४ ची ‘मॅजिक फिगर’ गाठणे मुश्कील असल्याने सत्तेचा सारीपाट मांडताना ‘जनसुराज्य’सह छोटे पक्ष व अपक्षांना महत्त्व येणार आहे.


‘रिपाइं’ ची ताकद विभागली!
प्रत्येक गावात ‘रिपाइं’ पक्षाची ताकद असल्याने या गटांना बेदखल करता येत नाही; पण ही ताकद विविध गटांत विभागल्याने या पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एकसंधपणे सर्व गट निवडणुकीला सामोरे गेले असते तर वेगळे चित्र दिसले असते.


असे आहेत उमेदवार रिंगणात-
जनसुराज्य -१४, ताराराणी आघाडी-६,युवक क्रांती-६, ताराराणी विकास आघाडी-५, बहुजन मुक्ती पार्टी-५, शेकाप-५, जनता दल-२, भारिप-३,बसप-२.


जिल्हा परिषदेच्या ६७ मतदारसंघात एकूण ६६ अपक्ष रिंगणात आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांसमोर या अपक्षांनी कमी-अधिक प्रमाणात आव्हान निर्माण केले आहे. दोन -तीन ठिकाणी अपक्ष बाजी मारण्याची शक्यताही आहे.

Web Title: The battle for 'JanaSurajya' is to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.