‘करवीर’मध्ये अस्तित्वाची लढाई

By Admin | Updated: October 10, 2014 23:00 IST2014-10-10T22:42:37+5:302014-10-10T23:00:01+5:30

‘पी. एन.- नरके’ यांची प्रतिष्ठा पणाला : ग्रामपंचायतीसारखी प्रचार यंत्रणा

The battle of existence in 'Karveer' | ‘करवीर’मध्ये अस्तित्वाची लढाई

‘करवीर’मध्ये अस्तित्वाची लढाई

राजाराम लोंढे - कोल्हापूर =-करवीरमध्ये पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्या अस्तित्वाची लढाई पाहावयास मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुकीसारखी यंत्रणा कार्यरत झाल्याने येथे टोकाचा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन सवयीप्रमाणे भूमिका बदलली असली तरी राजू सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या तडजोडी यशस्वी झाल्या, तर नरके व पाटील या मातब्बरांसमोरील अडचणी वाढू शकतात.
नरके, पाटील व सूर्यवंशी यांच्यासह ‘भाजप’चे के. एस. चौगुले, ‘मनसे’चे अमित पाटील हेही नशीब अजमावत आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यापर्यंत पाटील, नरके व सूर्यवंशी यांची प्रचारातील ईर्ष्या कायम आहे. पाटील यांनी नरके यांच्या पाच वर्षांतील कार्यपुस्तिकेलाच टीकेचे लक्ष केले आहे. जिल्हा परिषद, डोंगरी विकास निधीतून झालेली कामे आपल्या कार्यपुस्तिकेत छापून नरके यांनी दिशाभूल सुरू केल्याची टीका ते करीत आहेत. जे पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे निवडणुका आल्या की मतदारसंघात उगवतात, त्यांना विकास काय दिसणार? अशी बोचरी टीका नरके करीत आहेत. आजी-माजी आमदार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, करवीरच्या विकासासाठी साथ देण्याचे आवाहन सूर्यवंशी करीत आहेत.
जुन्या करवीरमधील कोपार्डे, शिये व वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघांत नरके यांचा वरचष्मा दिसत असला तरी गेल्यावेळचे मताधिक्य राखताना त्यांची दमछाक होणार आहे. कळे, यवलूज मतदारसंघांत पाटील यांचे चांगले पॅचवर्क झाले आहे. त्यात के. एस. चौगुले व सूर्यवंशी कोणाची मते खेचतात, यावरच येथील मताधिक्य अवलंबून आहे. कळे व बाजारभोगाव परिसरात नरके यांची हवा कायम आहे. गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादीचे पी. जी. शिंदे यांनी नरके यांना पाठिंबा दिल्याने येथे मताधिक्यासाठी नरके व पाटील यांना कसरत करावी लागणार आहे.
सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाने गेल्या वेळेला नरके यांना मताधिक्य दिले होते. आता तशी परिस्थिती नसली तरी सूर्यवंशी यांचे कार्यक्षेत्र याच मतदारसंघात येत असल्याने पाटील, नरके व सूर्यवंशी यांच्या गटांचे अस्तित्व पणाला लागले आहे. सडोली खालसा व परिते जिल्हा परिषद मतदारसंघ पाटील यांचे होम पीच असले तरी येथील राष्ट्रवादीची ताकद नरके यांच्या पाठीशी आहे. गेल्या वेळेला या परिसराने पाटील यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य दिले होते. एकंदरीत जुन्या करवीरमध्ये पाटील यांनी केलेले पॅचवर्क, पन्हाळा-गगनबावड्यातील नरके यांची हवा व जुन्या सांगरूळमध्ये सूर्यवंशी यांनी ठेवलेला संपर्क पाहता शेवटपर्यंत विजयाचा लंबक झुलत राहणार, हे निश्चित.

करवीर
एकूण मतदार २,८७,४८0
प्रचारातील मुद्दे -
चंद्रदीप नरके यांच्या कार्यपुस्तिकेवर विरोधकांची टीकेची झोड
पी. एन. पाटील यांच्या मतदारसंघातील संपर्कावरून विरोधक आक्रमक
नरके यांच्या पक्षनिष्ठेवर कॉँग्रेसचा हल्लाबोल
सर्वच उमेदवारांची एकमेकांवर व्यक्तिगत पातळीवर टीकाटिपणी
आमदार चंद्रदीप नरके आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यातील निधीचा श्रेयवाद आणि पोष्टरबाजी

Web Title: The battle of existence in 'Karveer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.