वस्त्रनगरीला ‘पेयजल’चा आधार
By Admin | Updated: June 4, 2015 00:04 IST2015-06-03T21:32:47+5:302015-06-04T00:04:08+5:30
टंचाईने हैराण : पात्र कोरडे पडल्याने कृष्णेतून उपसा बंद; कूपनलिकांचाही आधार

वस्त्रनगरीला ‘पेयजल’चा आधार
इचलकरंजी : प्रदूषणामुळे पंचगंगा नदीतून उपसा बंद आणि कृष्णा नदीचे पात्र कोरडे अशा स्थितीत तीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराला तीव्र पाणीटंचाई भासत असताना वस्त्रनगरीची तहान नऊ ठिकाणच्या शुद्ध पेयजल प्रकल्पांनी भागविली. तसेच नगरपालिकेच्या कूपनलिकांमुळेही नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
इचलकरंजी शहराची लोकसंख््या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत काही कारणाने बिघाड झाल्यास, नदीत पाणी नसल्याने, प्रदूषणामुळे पुरवठा बंद ठेवावा लागल्यास नागरिकांचे हाल होतात. सध्या त्याची प्रचिती येत आहे. पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासूनच येथील पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे तीन दिवसांनी एकदा मिळणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्यावरच शहरवासीयांना आपली तहान भागवावी लागत होती. २५ मेच्या दरम्यान पाटबंधारे खात्याकडून नदीच्या पात्रात असलेले कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्या. परिणामी कृष्णा नदीचे पात्रही कोरडे पडले. त्यामुळे गेले आठ-नऊ दिवस कृष्णा नळ पाणीयोजनेचा पाणीपुरवठाही ठप्प झाला.
शहरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली; पण साधारणत: पाच वर्षांपूर्वी आवाडे जनता सहकारी बॅँक, इचलकरंजी सहकारी सूतगिरणी, नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी यांनी शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या नऊ प्रकल्पांनी सकाळपासून रात्रीपर्यंत अव्याहतपणे शुद्ध पाणी दिले. दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी मिळत असल्याने शहरवासीयांची तहान भागली. त्यामुळे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांतून नागरिकांना मुक्तता मिळाली. (प्रतिनिधी)