लक्ष्मीपुरीत बिर्याणी गाडीचालकाचा खून

By Admin | Updated: November 14, 2014 01:01 IST2014-11-14T00:59:22+5:302014-11-14T01:01:48+5:30

चेष्टेचे कारण; संशयित ताब्यात

Bariyani car driver murdered in Lakshmipur | लक्ष्मीपुरीत बिर्याणी गाडीचालकाचा खून

लक्ष्मीपुरीत बिर्याणी गाडीचालकाचा खून

कोल्हापूर : मद्यप्राशन करताना चेष्टा केल्याच्या कारणावरून बिर्याणी गाडीचालकाचा खून झाल्याची घटना आज, गुरुवारी रात्री लक्ष्मी रोडवरील एका दुकानाच्या दारात घडली. असीफ सलीम मोमीन (वय ३५ रा. रविवार पेठ बँकेसमोर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित अब्दुलअजिझ मोहिद्दीन मलबारी (५८ रा. सिरत मोहल्ला, जवाहरनगर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
असीफ मोमीन याचा खून झाल्याचे समजताच सीपीआर आवारात त्याच्या मित्र, नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, असीफ मोमीन याची लक्ष्मीपुरीतील श्रद्धानंद हॉलशेजारी व गंगावेश येथे बिर्याणीची गाडी आहे.
आज रात्री मद्यप्राशन करण्यासाठी लक्ष्मीरोड येथील एका बिअर बारमध्ये असिफ व अब्दुलअजिझ हे दोघे गेले होते. त्यावेळी दोघांत वाद झाला. या वादामधून दोघे बारमधून बाहेर आले. त्यानंतर लक्ष्मी रोडवरील एका दुकानाजवळ ते आले असता अचानक संशयित अब्दुलअजिजने स्वत:जवळील चाकूने असीफच्या छातीवर हल्ला केला. त्यावर असीफ जागीच कोसळला. त्यानंतर काही जणांनी असिफला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. पण, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर काहीवेळ अब्दुलअजिझ हा तेथेच थांबून होता. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संशयित अब्दुलअजिझला पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मद्यप्राशन करताना नेहमी असीफ माझी चेष्टा करायचा’ अशा रागामधून त्याच्यावर हल्ला केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयित हा स्क्रॅप मटेरियल व मासेविक्रीचा व्यवसाय आहे.
मृत असीफ हा विवाहित आहे. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या भावाने संशयित अब्दुलअजिझ मलबारीला ताब्यात घेतल्याशिवाय असिफवर अंत्यसंस्कार करायचे नाही, असा पवित्रा सीपीआरमध्ये पोलिसांसमोर घेतला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. नातेवाईकांनी त्याची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास तो तयार झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Bariyani car driver murdered in Lakshmipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.