उद्धव गोडसेकोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे साडेतीन महिन्यांत पूर्ण खंडपीठात रूपांतर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभात दिले होते. याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली जाणार आहे. दरम्यान, सर्किट बेंचच्या कामकाजाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला. वेळ आणि पैशाची बचत झाल्याने पक्षकारांनी न्याय आपल्या दारी आल्याची भावना व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते १७ ऑगस्टला सर्किट बेंचचे शानदार उद्घाटन झाले. त्यानंतर १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. एक डिव्हिजन बेंच आणि दोन स्वतंत्र एकल बेंचमार्फत न्यायनिवाड्याचे कामकाज अत्यंत गतीने आणि सुरळीतपणे सुरू आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसाठी ही मोठी संधी ठरत आहे.
सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठात रूपांतर करण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना सरन्यायाधीश गवई यांनी उद्घाटन समारंभात केली होती. हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून पाठवला जातो. याबाबत गतीने कार्यवाही व्हावी, अशी विनंती जिल्हा बार असोसिएशनने मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर सी.जे. यांना पत्राद्वारे केली आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांनी दिली.
जमिनीच्या वादातून गेली सहा वर्षे मी मुंबईला हेलपाटे मारत होतो. कोल्हापूर सर्किट बेंचमुळे मुंबईला जाण्याचा खर्च आणि वेळ वाचला. आता सकाळी घरातून निघून सुनावणीचे काम संपवून मी संध्याकाळी घरी जातो. -सागर पाटील, पक्षकार, सांगली
सर्किट बेंचमुळे कोल्हापुरातील तरुण वकिलांना अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्किट बेंचचे कामकाज जाणून घेण्यासाठी रोज तरुण वकिलांची गर्दी असते. पक्षकारांनाही याचा फायदा होत आहे. - विजयकुमार ताटे-देशमुख, वकील