बापूजी साळुंखे यांचे कार्य प्रेरणादायी

By Admin | Updated: June 13, 2016 00:14 IST2016-06-12T23:55:19+5:302016-06-13T00:14:42+5:30

रेणुताई गावस्कर : ‘शिकूया व शिकवूया’ विषयावरील व्याख्यानाला प्रतिसाद

Bapu Salunkhe's work is inspirational | बापूजी साळुंखे यांचे कार्य प्रेरणादायी

बापूजी साळुंखे यांचे कार्य प्रेरणादायी

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सर्वसामान्य बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणारी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करून समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रेणुताई गावस्कर यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंती समारंभानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित ‘शिकूया व शिकवूया’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘बीसीयूडी’चे संचालक डी. आर. मोरे, साहित्यिका अनुराधा गुरव, प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य पी. एस. चव्हाण, डॉ. शरद्चंद्र साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व प्रार्थनागीताने झाली. यावेळी महेश हिरेमठ यांनी भक्तिगीत सादर केले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गावस्कर म्हणाल्या, शिक्षण घेणारी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यांना खेळांचे शिक्षण देणे गरजेचे असते; कारण त्यातूनच जय-पराजयाची शक्ती निर्माण होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम पुस्तकांचे ज्ञान देऊन वाचनाची गोडी निर्माण करावी.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून अध्यापनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लावून त्यांना बदलत्या जगाचे ज्ञान दिले पाहिजे. डॉ. साळुंखे यांचा विद्यार्थी म्हणून शिकलो व आज कुलगुरुपदापर्यंत पोहोचलो. सकाळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बापूजी साळुंखे व सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. प्रा. एम. ए. पिरजादे व प्रा. पल्लवी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक करांडे यांनी परिचय करून दिला. सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Bapu Salunkhe's work is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.