‘आयआरबी’ची बँक गॅरंटी जप्त करून रस्ते पूर्ण करणार
By Admin | Updated: November 18, 2014 00:08 IST2014-11-17T23:57:40+5:302014-11-18T00:08:33+5:30
ंमहापालिकेचा दणका : नगररचना विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांना आज पाठविणार पत्र; ‘आयआरबी’च्या पत्राला सडेतोड उत्तर देण्याची तयारी

‘आयआरबी’ची बँक गॅरंटी जप्त करून रस्ते पूर्ण करणार
कोल्हापूर : शहरात राबविण्यात आलेल्या रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांसह जाऊळाचा गणपती ते इराणी खण हा अर्धवट राहिलेला मुख्य रस्ता करण्यास ‘आयआरबी’ने नकार दिला आहे. त्यामुळे ‘आयआरबी’च्या २५ कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करून, त्यातून ही अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश व्हावेत, असे पत्र महापालिकेने नगररचना विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या सहीने उद्या, मंगळवारी हे पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘आयआरबी’ची अनामत रक्कम वर्ग करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील करारानुसार प्रलंबित व अपूर्ण कामे पूर्ण करावीत, असे १ आॅक्टोबर २०१४ला महापालिकेने पत्राद्वारे आयआरबीला कळविले होते. ही मागणी फेटाळत आयआरबीने उद्दिष्टांपेक्षा ३० टक्क्यांपेक्षा कमी टोलवसुली होत आहे. कृती समितीचे आंदोलन व नागरिकांतील रोष यामुळे कामे क रण्यास अडचणी येत आहेत. शहरातील या अपूर्ण कामांचा दर चार वर्षांपूर्वीच्या ‘डीएसआर’नुसार आहे. त्यामुळे रंकाळा-जुना वाशी नाक्यासह इतर कामे करणे सध्या तरी अशक्य असून, ही अपूर्ण कामे कंपनीने केलेल्या जादा कामाच्या खर्चातून महापालिकेनेच करावीत, असे आयआरबी व्यवस्थापनाने १७ आॅक्टोबर २०१४च्या पत्राद्वारे कळविले आहे. आयआरबीने काम करण्यास नकार दिल्याने टोल आंदोलक व नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.
रंकाळा-फुलेवाडीदरम्यान पेट्रोल पंपासमोरील ‘आयआरबी’चा रस्ता २२ आॅक्टोबरला दिवाळीच्या पहाटे खचला. खराब रस्त्यांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे. रंकाळा-जुना वाशी नाकादरम्यान ड्रेनेजपाईपचे काम गेली साडेपाच वर्षे सुरू होते.
आता काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता कोणी करायचा, हा नवा वाद उद्भवला आहे. त्यामुळे भविष्यातही शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याभोवतीचा रस्ता ‘जैसे थे’च राहण्याची शक्यता आहे. परिणामी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आयआरबीच्या बँक गॅरंटीचे पैसे परत मिळविण्याचे जोरदार प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरू केले आहेत. (प्रतिनिधी)
''
राजकीय पाठबळाची गरज
महापालिका प्रशासनाने सचिव श्रीकांत सिंह यांना ‘आयआरबी’ची अनामत जप्त करण्यासाठीची परवानगी मागणारे पत्र तयार केले आहे. उद्या, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सहीने हे पत्र सचिवांकडे मंगळवारी रवाना केले जाणार आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना आता राजकीय पाठबळाची गरज असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे.