बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी

By Admin | Updated: March 18, 2016 00:51 IST2016-03-18T00:49:31+5:302016-03-18T00:51:41+5:30

अमोल पवार प्रकरण : सातजणांचा समावेश; मृताचा मोबाईल सापडला

Bank officials inquiry | बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी

बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला अर्थपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर शहरातील सात बँकेच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान, मृत रमेश नायक (रा. गडहिंग्लज) याचा गारगोटी-उत्तूर पाल घाटात सापडला. पोलिसांनी संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना घाटात तपासासाठी दुपारी नेले होते. आज, शुक्रवारी पवार याला अर्थपुरवठा करणाऱ्या काही बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.
गेल्या आठवड्यात गडहिंग्लज येथील रमेश नाईक याचा आजरा-आंबोली या मार्गावर कार पेटवून खून केल्याप्रकरणी संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक (रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि. १७) बालगोपाल तालीमजवळील युथ बँक शाखा, व्हीनस कॉर्नर येथील सुंदरलालजी सावजी बँक शाखा, राजारामपुरी येथील डोंबिवली नागरी सहकारी को-आॅप बँक शाखा आणि बागल चौकातील वीरशैव को-आॅप बँकेची शाखा, लक्ष्मीपुरीतील श्रीराम फायनान्सची शाखा, लक्ष्मीपुरीतील विश्वेश्वर को-आॅप बँक शाखा व मंगळवार पेठेतील अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अमोल पवारच्या कर्जाबाबत माहिती घेतली तसेच एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स या कंपनीतील अधिकाऱ्यांना चौकशीकामी बोलावण्यात आले असून, त्यांच्याकडे चौकशीचे काम सुरू आहे. त्यातील काही बँक अधिकाऱ्यांना पुन्हा आज, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावणार आहेत.
मृत रमेश नाईक याचा मोबाईल गारगोटी पाल घाटात पवार बंधूंनी फेकून दिला होता. गुरुवारी संशयितांना पोलिसांनी घाटात फिरविले. त्यावेळी पवार बंधूंनी गडहिंग्लजमधून रमेश नायक याला उत्तूरमार्गे आजरा-आंबोलीमार्गे नेताना कारमधून नाईक याचा मोबाईल घाटात फेकल्याची कबुली यावेळी पोलिसांना दिली. त्याच्या मोबाईलची शोधाशोध घाटात केली असता मोबाईल सापडला. त्याचबरोबर पेट्रोल पंपावर अमोल पवार याने गुन्ह्णाच्यावेळी पेट्रोल भरले होते तेथील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.


आता होणार नगरसेवकांची चौकशी...
अमोल पवारला अर्थपुरवठा करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आता त्यानंतर पवारला अर्थपुरवठा करणाऱ्या काही नगरसेवकांची पुढील दोन दिवसांत चौकशी सुरू करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Bank officials inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.