बँकांची कर्जवसुली थंडावली
By Admin | Updated: February 13, 2015 23:29 IST2015-02-13T23:26:41+5:302015-02-13T23:29:41+5:30
निवडणुकांचा परिणाम : धोका नको म्हणून काहीसे दुर्लक्ष, कर्जदारही काहीसे निवांत

बँकांची कर्जवसुली थंडावली
रमेश पाटील - कसबा बावडा -मार्च एंडिंग जवळ आला की, बँकांना कर्जे वसुलीची घाई लागते. परंतु, ज्या बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अशा बँकांची कर्जवसुली मोहीम कासवाच्या गतीने सुरू आहे. थकीत कर्जदाराच्या मागे फारसा तगादा नाही. काही बँकांनी तर थकीत कर्जदाराला नोटिसा पाठविणे बंदच करून टाकले आहे. त्यामुळे कर्जदारही काहीसे निवांत आहेत. जिल्ह्यातील अर्धा डजनहून अधिक बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
कर्जाची वसुली करून ‘एनपीए’ खाली आणणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. नोटिसा पाठवूनही कर्जदार कर्ज भरत नसल्याने बँकांनी मोठ्या कर्मचारी संख्येने कर्जदाराच्या दारात जाऊन, घेराव घालून वसुली मोहीम सुरू ठेवली आहे. मात्र, याला निवडणुका जाहीर झालेल्या बँकांपैकी काही बँका अपवाद ठरल्या आहेत. उगाच निवडणुकीत ‘रिस्क’ नको म्हणून त्यांनी कर्जवसुलीकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. कर्जदार स्वत:हून आला आणि कर्ज भरले तर भरून घ्या, अशा तोंडी सूचना काही बँकांनी केल्या आहेत.
एका सभासदाला कर्ज देताना दोन सभासद जामीनदार लागतात. त्यामुळे प्रत्येक थकीत कर्जदाराला जेव्हा नोटीस पाठवली जाते, तेव्हा दोन जामीनदारांनाही नोटिसा पाठवण्यात येतात. त्यामुळे आपला काही संबंध नसताना घराकडे नोटीस आल्यावर जामीनदार संतप्त होतात. याचा आपल्या मतदानावर परिणाम कोठेही होऊ नये, यासाठी सध्या मेंबर कर्जदाराच्या मागे बँका लागायच्या थांबल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात बँकांबरोबरच विकास सेवा संस्था, पतसंस्था,
साखर कारखाने यांच्याही निवडणुका लागल्या आहेत. बँकांप्रमाणे
विकास संस्था आणि पतसंस्था यांच्याही कर्जवसुलीवर काहीसा परिणाम होऊ लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत सभासद दुखावला जाता कामा नये, याकडे बहुतेक सहकारी संस्थांनी लक्ष
दिले आहे.
थकबाकी वाढणार
निवडणुकांमुळे कर्जे वसुलीकडे संस्थांनी दुर्लक्ष केल्यास त्यांची थकबाकी वाढण्याची शक्यता दाट आहे. कर्जवसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा फायदा संचालकांना होईल. मात्र, संस्था तोट्यात जाण्यास हातभार लागेल, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कर्जे, ठेवी वाढवण्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना
निवडणुकांमुळे नागरी बँकांतली वसुली मोहीम थंडावली असली तरी मार्च एंडिंग जवळ आल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचीही वसुली मोहीम जोरात सुरू झाली आहे. बँकांच्या प्रत्येक शाखेला १५ टक्के कर्ज वाढवण्याच्या व २० टक्के ठेवी वाढवण्याच्या सूचना व्यवस्थापनाने केल्या आहेत. त्याच्या तयारीसाठी
बँक मॅनेजर केबीनमध्ये न बसता बाहेर पडत आहेत.