कोल्हापूर : कर्जवसुलीची रक्कम घेऊन येणारे ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेचे कलेक्शन मॅनेजर सूरज बाळासाहेब पाटील (वय ३१, सध्या रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर, मूळ रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) यांच्याकडील एक लाख ५९ हजारांची रोकड आणि टॅब असा पावणेदोन लाखांचा ऐवज तिघांनी लुटला.
हा प्रकार सोमवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास गारगोटी रोडवरील कात्यायनी घाटात घडला. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी मंगळवारी (दि. ५) रात्री उशिरा अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल केला.करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज पाटील हे ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेच्या साने गुरुजी वसाहत शाखेत कलेक्शन मॅनेजर पदावर काम करतात. सोमवारी रात्री ते इस्पुर्ली आणि येवती येथील महिला गटांकडून कर्ज वसुली करून परत कोल्हापुरात येत होते. त्यावेळी कात्यायनी घाटात भिवटे मळा येथे पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून तिघे दुचाकीजवळ आले.त्यातील मागे बसलेल्या तरुणाने पाटील यांच्या पाठीवरील सॅक हिसकावली. त्यानंतर त्यांची मोपेड भरधाव वेगाने निघून गेली. सॅकमध्ये १ लाख ५९ हजारांची रोकड, १५ हजारांचा टॅब, मोबाइल चार्जर, रिसिट बुक असा पावणेदोन लाखांचा ऐवज होता. बँकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मंगळवारी फिर्याद दिली.विविध शक्यतांची पडताळणीकात्यायनी घाटात भिवटे मळा येथे लूट झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांनी आसपासचे हॉटेल्स, लॉज यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. मात्र, घटना घडलेल्या वेळेत त्यांना संशयित मोपेड दिसली नाही. लूट करणारे चोरटे कुठून आले आणि कोणत्या दिशेला गेले याचा शोध सुरू आहे, तसेच विविध शक्यतांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.