प्रशासकांकडून बँँक खाती सील
By Admin | Updated: November 16, 2014 00:52 IST2014-11-16T00:31:10+5:302014-11-16T00:52:08+5:30
बाजार समिती कारभाराचा गोंधळ : उपाध्यक्षांनी घेतले दप्तर ताब्यात

प्रशासकांकडून बँँक खाती सील
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांना आज, शनिवारी दुसऱ्या दिवशीही पदभार देण्यास अशासकीय मंडळाच्या सदस्यांनी मज्जाव केला; पण लाखे यांनी समितीच्या राष्ट्रीय व नागरी बॅँकांतील खाती सील केली असून, आपल्या सही शिवाय व्यवहार करू नयेत, अशा सूचना बॅँकांना दिल्या आहेत. त्यामुळे समितीचे व्यवहार ठप्प होणार आहेत. उपाध्यक्ष प्रा. निवास पाटील यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष केबिनसह संपूर्ण कार्यालय आज बंद करून दप्तर ताब्यात घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
लाखे आज पदभार स्वीकारण्यासाठी पुन्हा येणार असल्याची कुणकुण लागताच सकाळपासून अशासकीय मंडळाचे सदस्य समितीत होते. आज कार्यालयाला सुटी होती. तरीही सदस्यांनी सर्व केबिन्सला कुलपे लावून सचिवांच्या केबिनमध्ये तळ ठोकला होता. रंजन लाखे दुपारी आल्यानंतर त्यांना चार्ज देण्यास सदस्यांनी मज्जाव केल्याने ते परत गेले. याबाबतची माहिती जिल्हा उपनिबंधकांना दिली.